यश ही तिची सवय झाली आहे..
नवी दिल्ली, 29 सप्टेंबर 2021
भारताची निष्णात बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू हिने टोक्यो ऑलिंपिकमध्ये इतिहास रचल्यापासून तिचे नाव देशाच्या घराघरात पोचले आहे. सिंधू ही लागोपाठच्या सलग दोन ऑलिंपिक स्पर्धांमध्ये पदक मिळविणारी पहिली महिला क्रीडापटू ठरली आहे. आधी, तिने रियो ऑलिंपिकमध्ये रौप्य पदक जिंकले. हाच विजयी प्रवास कायम राखत तिने टोक्यो ऑलिंपिकमध्ये चीनच्या ही बिंगजियाओ या खेळाडूला 21-13, 21-15 अशी मात देत कांस्य पदक पटकाविले.सातत्याने यश मिळवणे ही तिची सवय झाली आहे.
ज्या बॅडमिंटन रॅकेटने सिंधूने नवा इतिहास रचला तिच्या मूल्याची आपण कल्पनाच करू शकत नाही. ती केवळ अनमोल आहे. मात्र, ही अनमोल रॅकेट आता कोणाच्याही मालकीची होऊ शकते. होय, तुम्ही बरोबर ऐकता आहात. देशाच्या कल्याणासाठी तुम्ही या अनमोल रॅकेटचा मालकीहक्क प्राप्त करून या ऐतिहासिक वस्तूसोबत तुमचे नाव जोडू शकता.
ऑलिंपिकमधील आपल्या असामान्य खेळाचे प्रदर्शन करून देशवासियांना भारावून टाकल्यानंतर, आता भारतात परतल्यावर लगेचच सिंधूने तिची रॅकेट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या स्वाधीन केली आहे. पंतप्रधानांना मिळालेल्या भेटवस्तूंचा ई-लिलाव सुरु झाला आहे हे तुम्हांला माहित असेलच. आणि आता सिंधूच्या रॅकेटचा समावेश लिलावासाठी उपलब्ध असलेल्या वस्तूंच्या यादीत करण्यात आला आहे. ही ई-लिलाव प्रक्रिया 17 सप्टेंबरला सुरु झाली असून, ती 7 ऑक्टोबरपर्यंत सुरु राहणार आहे.
तुम्ही देखील प्रख्यात बॅडमिंटनपटूने वापरलेल्या या रॅकेटचे मालक होऊ शकता. त्यासाठी तुम्हांला केवळ www.pmmementos.gov.in या संकेतस्थळाला भेट देऊन ई-लिलावात भाग घ्यावा लागेल. सिंधूच्या या ऐतिहासिक रॅकेटची सुरुवातीची किंमत 80 लाख रुपये निश्चित करण्यात आली आहे, म्हणजे या किंमतीपासून पुढे लिलावाची बोली सुरु होईल. यावेळीदेखील लिलावातून मिळणारे उत्पन्न ‘नमामि गंगे कोशात’ जमा करण्यात येईल.