2013च्या मॅच फिक्सिंगनंतर दोषी आढळलेल्या एस. श्रीसंतचं धक्कादायक विधान
नवी दिल्ली,
आयपीएलच्या स्पॉट फिक्सिंगमध्ये अडकलेल्या एस. श्रीसंतने एक धक्कादायक विधान केलं आहे. श्रीसंत 2013 साली आयपीएलच्या दरम्यान स्पॉट फिक्सिंगमध्ये दोषी आढळला होता.
एस. श्रीसंतने स्पोटर्सकीडाला दिलेल्या माहितीनुसार, ‘एका ओव्हरमध्ये 14 पेक्षा अधिक रन्सची गरज होती. त्यावेळी मी 4 बॉल्समध्ये केवळ 5 रन्स दिले होते. इतकंत नव्हे तर कोणताही नो बॉल, वाईड बॉल किंवा कोणताही स्लो बॉल त्यावेळी टाकण्यात आला नव्हता. माझ्या पायावर शस्त्रक्रिया झाली असताना देखील 130 च्या वेगाने मी बॉलिंग करत होतो.‘
श्रीसंत पुढे म्हणाला, ‘मी इरानी ट्रॉफीमध्ये भाग घेतला होता आणि आफ्रिकेविरूद्धच्या सिरीजसाठी स्वत:ला तयार करत होतो. दौर्यावर आम्ही लवकर निघत होतो. त्या मालिकेचा एक भाग बनणं हे माझं ध्येय होतं. अशी व्यक्ती असं काही करणार नाही आणि तेही 10 लाख रुपयांसाठी. मी नुसतं बोलत नाहीये, पण जेव्हा मी पार्टी करायचो, तेव्हा माझी बिलं सुमारे 2 लाख रुपये यायची.‘
श्रीसंतने या प्रकरणाशी संबंधित 13 मुख्य आरोपींचा देखील यावेळी उल्लेख केला. ज्यांची नावं तो घेऊ इच्छित नाही. कोणावरही आरोप करणं खूप वाईट आहे. या संपूर्ण प्रकरणात अजून 13 नाव असून ती सर्वोच्च न्यायालयात आहेत.
श्रीसंत पुढे म्हणतो ‘मी, माझं कुटुंब आणि माझ्या प्रिय व्यक्ती सर्वात कठीण काळातून गेले आहेत. त्यांच्यासाठी हा अनुभव मृत्यूच्या बरोबरीचा होता. हे माझ्या आणि माझ्या मित्रांच्या बाबतीत घडलं, म्हणून मी 13 आरोपींची नावं सांगू शकत नाही. ते 13 लोक कोण होते हे सिद्ध होईपर्यंत मी एकही नाव घेणार नाही.‘
आयपीएलमध्ये पुनरागमन करणार का श्रीसंत?
भारतीय वेगवान गोलंदाज श्रीसंत 2013 पासून क्रिकेटपासून दूर आहे. घरच्या मैदानावर खेळात पुनरागमन केल्यानंतर श्रीसंतने आयपीएल 2021च्या लिलावासाठी स्वत:ची नोंदणी केली होती, परंतु त्याला कोणताही खरेदीदार सापडला नाही. पण जर पुढच्या वर्षी मेगा लिलाव झाला तर श्रीसंतला आशा आहे की त्याला खरेदीदार मिळेल.