पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि जपानचे पंतप्रधान सुगा योशिहिदे यांच्यात बैठक

नवी दिल्ली – 24 SEP 2021

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी  क्वाड नेत्यांच्या शिखर परिषदेच्या  पार्श्वभूमीवर  23 सप्टेंबर 2021 रोजी  वॉशिंग्टन डीसी येथे जपानचे पंतप्रधान सुगा योशिहिदे.यांची भेट घेतली.

दोन्ही पंतप्रधानांनी त्यांच्या पहिल्या प्रत्यक्ष  भेटीबद्दल आनंद व्यक्त केला. सप्टेंबर 2020  पासून सुगा यांनी जपानचे पंतप्रधान म्हणून पदभार स्वीकारल्यापासून उभय नेत्यांमध्ये तीन वेळा  दूरध्वनी संवाद झाल्याची आठवण त्यांनी करून दिली. गेल्या काही वर्षांमध्ये भारत-जपान विशेष धोरणात्मक आणि जागतिक भागीदारीमध्ये मोठी प्रगती साधण्यासाठी  पंतप्रधान व यापूर्वी मुख्य कॅबिनेट सचिव म्हणून  वैयक्तिक बांधिलकी आणि नेतृत्वाबद्दल पंतप्रधान मोदींनी सुगा यांचे  आभार मानले. जागतिक महामारीच्या काळात टोकियो ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक स्पर्धा यशस्वीपणे आयोजित केल्याबद्दल त्यांनी पंतप्रधान सुगा यांचे अभिनंदन केले.

दोन्ही पंतप्रधानांनी उभय देशांमधील बहुआयामी संबंधांचा आढावा घेतला आणि अफगाणिस्तानसह अलिकडील जागतिक आणि प्रादेशिक घडामोडींवर विचारांची देवाणघेवाण केली. त्यांनी मुक्त, खुल्या आणि सर्वसमावेशक  हिंद -प्रशांत क्षेत्राबद्दलच्या त्यांच्या वचनबद्धतेचे समर्थन केले. संरक्षण उपकरणे आणि तंत्रज्ञानाच्या क्षेत्रासह द्विपक्षीय सुरक्षा आणि संरक्षण सहकार्य वाढविण्याबाबत त्यांनी  सहमती दर्शवली.

दोन्ही देशांमधील वाढत्या आर्थिक सहभागाचे दोन्ही  पंतप्रधानांनी स्वागत केले. त्यांनी या वर्षाच्या सुरुवातीला भारत, जपान आणि ऑस्ट्रेलिया दरम्यान पुरवठा साखळी लवचिकता उपक्रम (एससीआरआय) सुरु केल्याचे  स्वागत केले.  लवचिक, वैविध्यपूर्ण आणि विश्वासार्ह पुरवठा साखळी सक्षम करण्यासाठी सहयोगी यंत्रणा म्हणून हा उपक्रम कार्य करेल. उत्पादन, एमएसएमई आणि कौशल्य विकासामध्ये द्विपक्षीय भागीदारी विकसित करण्याची गरज पंतप्रधान मोदींनी अधोरेखित केली. पंतप्रधान सुगा यांनी पंतप्रधान मोदींना सांगितले की, या वर्षाच्या सुरुवातीला स्वाक्षरी केलेला विशिष्ट कुशल कामगार (SSW) करार कार्यान्वित करण्यासाठी, जपान 2022 च्या सुरुवातीपासून भारतात कौशल्य आणि भाषा चाचण्या घेणार आहे.

दोन्ही पंतप्रधानांनी कोविड -19 महामारी आणि प्रतिबंधात्मक  उपाय करण्याच्या प्रयत्नांवर चर्चा केली. त्यांनी डिजिटल तंत्रज्ञानाचे वाढते महत्त्व अधोरेखित केले आणि या संदर्भात भारत-जपान डिजिटल भागीदारीतील विशेषत: स्टार्ट-अप मधील प्रगतीचे सकारात्मक मूल्यांकन केले. त्यांनी विविध उदयोन्मुख तंत्रज्ञानामध्ये सहकार्य वृद्धिंगत करण्यासाठी  विचारांची देवाणघेवाण केली. हवामान बदलाची समस्या  आणि हरित ऊर्जा संक्रमण तसेच भारताच्या राष्ट्रीय हायड्रोजन ऊर्जा अभियानात  जपानी सहकार्याची शक्यता  यावर देखील चर्चा झाली.

दोन्ही पंतप्रधानांनी मुंबई-अहमदाबाद हाय स्पीड रेल (MAHSR) प्रकल्पाची सुरळीत आणि वेळेवर अंमलबजावणी सुलभ करण्याच्या प्रयत्नांना गती देण्याच्या  आपल्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला.

दोन्ही नेत्यांनी भारत-जपान ‘ॅक्ट ईस्ट फ़ोरम’ अंतर्गत भारताच्या ईशान्य भागातील द्विपक्षीय विकास प्रकल्पांमधील प्रगतीचे स्वागत केले आणि या  सहकार्यात आणखी वाढ करण्याच्या संधींची दखल घेतली.

 गेल्या काही वर्षांमध्ये भारत-जपान भागीदारीने मिळवलेली मजबूत गती जपानमधील नवीन प्रशासनातही कायम राहील असा विश्वास पंतप्रधान सुगा यांनी व्यक्त केला. नजीकच्या काळात  भारत-जपान वार्षिक शिखर परिषदेसाठी जपानच्या पुढील पंतप्रधानांचे भारतात स्वागत करण्यासाठी उत्सुक असल्याचे पंतप्रधान मोदींनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!