चेन्नई सुपरकिंगमध्ये धोनीच्या जागी कोण, अंदाज सुरु
नवी दिल्ली
कॅप्टन कुल महेंद्रसिंग धोनीने वयाची चाळीशी गाठली आहे आणि आयपीएलच्या सध्याच्या सिझन नंतर किंवा फारतर पुढच्या सिझनच्या आधी तो निवृत्ती घेईल असे संकेत मिळत आहेत. त्यामुळे चेन्नई सुपरकिंग मधली धोनीची जागा कुणाला मिळणार याविषयी अंदाज बांधले जाऊ लागले आहेत. त्यात चार खेळाडूंची नावे प्रामुख्याने चर्चेत आहेत. धोनीने टीमला तीनवेळा खिताब मिळवून दिला आहे त्यामुळे योग्य खेळाडूच्या हाती या यलो आर्मीची कमान सोपविली जाणार हे उघड आहे.
यात सर्वात आघाडीवर असलेले नाव आहे रविंद्र जडेजा. त्याला या जागेसाठी सर्वात प्रबळ दावेदार मानले जात आहे. सध्या तो जबरदस्त फॉर्ममध्ये आहे शिवाय धोनीचा त्याच्यावर पूर्ण विश्वास आहे. या यादीत दुसरे नाव आहे सुरेश रैना याचे. त्यालाही आयपीएल मधील धोनीचा उत्तराधिकारी मानले जात आहे. तो खरच कप्तान बनला तर किमान तीन वर्षे खेळेल. मात्र रैनाने धोनी चेन्नई सुपरकिंग मध्ये नसेल तर तोही खेळणार नाही असे पूर्वी जाहीर केले आहे.
अन्य दोन नावांमध्ये ॠतुराज गायकवाड आणि शार्दुल ठाकूर यांची नावे घेतली जात आहेत. या दोघांनीही 2020 मध्ये चेन्नई सुपरकिंग टीम मध्ये डेब्यू केला आहे. गायकवाड भरोसेमंद खेळाडू आहे तर शार्दुल कडे आंतरराष्ट्रीय सामन्याचा अनुभव आणि आत्मविश्वास आहे. फ्रांचाईजी जर दीर्घकालीन कॅप्टन योजना आखत असेल तर या दोघांच्या नावाचा विचार होऊ शकतो असे सांगितले जात आहे.