अमेरिकेच्या सीआयएचा अधिकारी भारतातील हवाना सिंड्रोमचा पहिला पेशंट

नवी दिल्ली,

भारतभेटीसाठी या महिन्याच्या सुरुवातीला आलेल्या एका सीआयए अधिकार्‍याला हवाना सिंड्रोम झाल्याची माहिती समोर आली आहे. भारतात हवाना सिंड्रोम आढळल्याचे हे पहिलेच प्रकरण आहे. लागण झालेले अमेरिकन अधिकारी सीआयएचे संचालक विल्यम बर्न्स यांच्या शिष्टमंडळाचा भाग होते. भारतात मुक्कामी असताना त्यांना वैद्यकीय मदत घ्यावी लागली, असे सीएनएन आणि एनवायटीवरील अहवालात म्हटले आहे.

अमेरिकेच्या उपराष्ट्रपती कमला हॅरिसच्या व्हिएतनाम भेटीला उशीर झाल्यानंतर ही बाब काही आठवड्यांनी समोर आली आहे. दरम्यान, अमेरिकन कर्मचार्‍यांनी गेल्या महिन्यात त्यांच्या प्रवासापूर्वी हवाना सिंड्रोमची लक्षणे असल्याचे सांगितले होते. 2016मध्ये क्युबामधील हवानामध्ये या सिंड्रोमचा पहिला रुग्ण आढळला होता. त्यामुळे त्याला हवाना सिंड्रोम नाव देण्यात आले. दरम्यान, अलीकडच्या काही वर्षांमध्ये हवाना या रहस्यमय न्यूरोलॉजिकल आजाराने रशिया, चीन, ऑॅस्ट्रिया आणि इतर अनेक देशांमधील अमेरिकन गुप्तहेर आणि मुत्सद्यांना ग-ासले आहे.

8 सप्टेंबरला अमेरिकेचे गुप्तहेर सीआयए प्रमुख विल्यम बर्न्स यांची दिल्लीत राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी भेट घेतली होती. तालिबानने अफगाणिस्तानमध्ये सत्ता चालवणार्‍या लोकांची नावे जाहीर केल्यानंतर या दोघांमध्ये बैठक झाली होती. हवाना सिंड्रोमची लागण ज्या अमेरिकन अधिकार्‍याला झाली आहे, ते अधिकारी देखील या बैठकीचा भाग होते आणि भारतात असताना त्यांना लक्षणे जाणवली अशी माहिती मिळत आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!