काल दिवसभरात देशात 35 हजार रुग्णांची नोंद, तर 281 रुग्णांना गमवावा जीव
नवी दिल्ली,
देशातील कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत मागील काही दिवसांपासून चढउतार होत असून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने नुकत्याच जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशातील रुग्णसंख्येत काल दिवसभरात 35 हजार 662 एवढी भर पडली आहे, तर 281 बाधितांचा मृत्यू झाला आहे. तर काल 33 हजार 798 जण कोरोनामुक्त झाले आहेत. काल वाढलेल्या नव्या रुग्णसंख्येपैकी एकट्या केरळमध्ये 23 हजार 260 नवीन रुग्ण सापडले आहेत. काल केरळमध्ये 131 जणांचा मृत्यू झाला आहे.
देशात शुक्रवारी एकाच दिवशी कोरोना लसीचे 2.5 कोटीहून अधिक डोस देण्यात आले. देशात जगातील सर्वात मोठा लसीकरणाचा कार्यक्रम सुरु असून आतापर्यंत चार वेळा एकाच दिवशी एक कोटीपेक्षा अधिक नागरिकांना लस देण्यात आली आहे.
दरम्यान महाराष्ट्रात काल 3,586 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 410 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 63 लाख 24 हजार 720 बाधितांनी कोरोनावर मात केल्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.08 टक्के आहे. राज्यात काल 67 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाल्यामुळे राज्याचा रिकव्हरी रेट 2.12 टक्के झाला आहे.
तर मुंबईतील कोरोनाबाधितांच्या गेल्या काही दिवसांपासून मोठी वाढ पाहायला मिळत आहे. काही दिवसांपासून वाढलेली आकडेवारी चिंतेचा विषय बनत आहे. काल दिवसभरात मुंबईत 434 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 387 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,13,992 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे.