एनसीआरबीच्या अहवालानुसार दिल्ली महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहर
नवी दिल्ली,
2020 या वर्षासाठीचा राष्ट्रीय गुन्हे नोंदणी विभागाचा हा अहवाल जाहीर झाला असून त्यानुसार, 2019 च्या तुलनेत 2020 मध्ये कोरोनाच्या काळात महिलांविरोधातील नोंद झालेल्या गुन्ह्यांचे प्रमाण 8.3 टक्क्यांनी घटले आहे. पण असे असले, तरी अन्य महानगरांच्या तुलनेत देशाच्या राजधानी शहरात सर्वाधिक हिंसक आणि महिलांविरोधातील गुन्ह्यांची नोंद झाली आहे. एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार महिलांसाठी दिल्ली हे सर्वात असुरक्षित शहर आहे.
देशाच्या राजधानीत 2020 मध्ये महिलांविरोधातील गुन्ह्यांची 10 हजार 93 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवण्यात आली आहेत. मुंबई, पुणे, गाझियाबाद, बेंगळुरू किंवा इंदूरमध्ये नोंदवलेल्या गुन्ह्यांच्या संख्येच्या तुलनेत ही संख्या दुपट्टीपेक्षा जास्त आहे. तर 2018 मध्ये दिल्लीत महिलांविरोधातील गुन्ह्यांची 13 हजार 640 प्रकरणे नोंदवण्यात आली होती आणि त्या पुढील वर्षी ही संख्या 300 ने कमी झाली होती. आकडेवारी असेही दर्शवते की बहुतेक प्रकरणांमधील गुन्हेगार हे पीडितांना ओळखत होते.
ऑनलाईन चोरी, फसवणूक आणि लैंगिक छळासह सायबर गुन्ह्यांमध्ये गेल्या वर्षी वाढ झाली आहे. 168 पेक्षा जास्त प्रकरणे दिल्लीमध्ये नोंदवण्यात आली आहेत. दरम्यान, इतर महानगरांच्या तुलनेत दिल्लीत सायबर गुन्ह्यांचे प्रमाण कमी असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे.
भारतीय दंड संहितेअंतर्गत (खझउ) दिल्लीमध्ये नोंदवलेल्या प्रकरणांची संख्या 2019 ते 2020 या एका वर्षात 18 टक्क्यांनी कमी झाल्याचे एनसीआरबीने जारी केलेल्या आकडेवारीत समोर आले आहे. दिल्ली पोलिसांनी गेल्या वर्षी 2.4 लाखांहून अधिक म्हणजेच दिवसाला 650 पेक्षा जास्त प्रकरणे नोंदवली होती. तर दुसरीकडे बंगळुरूमध्ये गुन्ह्यांची 19 हजार 964 आणि मुंबईत 50 हजार प्रकरणे नोंदवली गेली. तर 2020 मध्ये खुनाचे एकूण 472 गुन्हे नोंदविण्यात आले. यामागे प्रेम प्रकरण आणि मालमत्तेचा वाद हे सर्वात सामान्य हेतू होते. तर 2019 मध्ये खुनाची 521 प्रकरणं नोंदवण्यात आली आहेत.
एनसीआरबीच्या आकडेवारीनुसार 2019 मध्ये अपहरणाची प्रकरणे 5 हजार 900 वरून 2020 मध्ये 4 हजार 62 झाली आहेत. त्यापैकी 3 हजारांपेक्षा जास्त प्रकरणात 12 ते 18 वयोगटातील पीडित होते. पण, आकडेवारीत घसरण होऊनही दिल्लीत अपहरणाचे सर्वाधिक गुन्हे नोंदवले गेले आहेत. दिल्ली पाठोपाठ मुंबईत 1 हजार 173 आणि लखनौमध्ये 735 प्रकरणांची नोंद झाली आहे.