माननीय राष्ट्रपतींच्या हस्ते 51 पुरस्कार विजेत्या परिचारिकांना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020 प्रदान

नवी दिल्ली,

राष्ट्रपती श्री, राम नाथ कोविंद यांनी एका आभासी समारंभात 51 पुरस्कार विजेत्या परिचारिकांना राष्ट्रीय फ्लॉरेन्स नाइटिंगेल पुरस्कार 2020 प्रदान केले. केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री श्री मनसुख मांडविया आणि केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री डॉ भारती प्रविण पवार यावेळी उपस्थित होते.

सर्व आरोग्य सेवा कर्मचारी आणि परिचारिकांचे अभिनंदन करत , राष्ट्रपतींनी नमूद केले की, सेवा आणि गरजूंना मदत करण्याची प्राचीन भारतीय परंपरा आपल्या परिचारिकांद्वारे होणार्‍या सेवेमधून प्रतिबिंबित होते. राष्ट्रपतींनी कोविड -19 विरूद्धच्या शौर्य लढ्यात परिचारिकांच्या नि:स्वार्थ योगदानाचे तसेच राष्ट्रीय कोविड लसीकरण कार्यक्रमाला गती देण्यासाठी परिचारिका घेत असलेल्या परिश्रमाचे उदाहरण दिले. ते म्हणाले की,आपल्या परिचारिकांच्या सेवेप्रती असलेल्या आदर्श निष्ठेमुळे दररोज एक कोटींहून अधिक लसीच्या मात्रा देणे शक्य झाले.ते म्हणाले की, ‘तुमची मेहनत हा आशेचा किरण आहे आणि लोकांना अंधारातून प्रकाशाकडे नेतो.‘ ज्यांनी आपले प्राण गमावले त्यांना श्रद्धांजली अर्पण करताना राष्ट्रपती म्हणाले, ‘देश तुमच्या सेवेचा ॠणी राहील.‘

सरकारच्या प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत आरोग्य कर्मचार्‍यांसाठी असलेल्या प्रसूती सेवा आणि विमा योजना यासारख्या विविध उपक्रमांना राष्ट्रपतींनी अधोरेखित केले.आरोग्य सेवा प्रदान करण्यातील एक महत्त्वाचा घटक म्हणून, परिचारकांची सार्वजनिक आणि आरोग्य सेवा व्यवस्थेतील पहिला दुवा म्हणून ओळख असल्याचे राष्ट्रपतींनी सांगितले.

डॉ.भारती प्रविण पवार यांनी आभार व्यक्त करताना, ज्यांनी जीव वाचवण्यासाठी अत्यंत कठीण काळात अथक परिश्रम घेतले, त्या सर्व परिचारिका आणि कोविड योद्ध्यांबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!