करोना विषाणूला थोपविण्यास कॉटन मास्कही सक्षम

नवी दिल्ली

करोना संक्रमणापासून सुरक्षा मिळावी यासाठी अन्य उपायांबरोबर मास्क वापरणे अनिवार्य बनले असतानाच स्वास्थ्य तज्ञांनी नुकत्याच केलेल्या एका अभ्यास संशोधनात कॉटन पासून बनलेले मास्क सुद्धा करोना विषाणू थोपविण्यास सक्षम असल्याचे दिसून आले आहे. मास्क वापराची आवश्यकता अधोरेखित झाली असताना एकापेक्षा अधिक वेळा वापरता येतील असे मास्क योग्य आहेत का या प्रश्नांचे उत्तर मिळविण्यासाठी अमेरिकेच्या कोलोराडो विद्यापीठात संशोधन करण्यात आले.

या संशोधनात असे दिसले की कॉटनपासून बनलेले मास्क धुवून पुन्हा पुन्हा वापरले गेले तरी वर्षाभरानंतर सुद्धा ते करोना विषाणूचा प्रवेश रोखण्यात पूर्वीप्रमाणेच प्रभावी आहेत. दोन पदरी कॉटन मास्कचा वापर करणार्‍यांना ते रिप्लेस करण्याची गरज नाही. एरोसोल आणि एअर क्वालिटी रिसर्च मध्ये हे संशोधन प्रसिद्ध झाले आहे.

या टीममधील संशोधक मरीना व्हेन्स म्हणाल्या, करोना साथ सुरु झाल्यापासून दररोज 7200 टन मेडिकल वेस्ट म्हणजे मेडिकल कचरा तयार होत आहे आणि त्यात डिस्पोजेबल मास्कचे प्रमाण मोठे आहे. यामुळे पर्यावरणाला धोका निर्माण होत असून तो कसा कमी करता येईल यावर संशोधन करण्यात आले. त्यात धुवून, वाळवून पुन्हा वापरता येतील असे कॉटन मास्क किती सुरक्षित आहेत याची परीक्षा केली तेव्हा वारंवार धुतल्याने सुद्धा या मास्क ची फिल्टर क्षमता तीच राहिल्याचे दिसून आले. फक्त हे मास्क वापरताना नाक आणि तोंड पूर्ण झाकले जाईल, मास्क आणि झाकायचा भाग यात फट राहणार नाही याची काळजी घ्यावी असे त्यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!