अमेरिका तालिबानला करणार 470 कोटींची मदत
नवी दिल्ली,
अफगाणिस्थानचा ताबा घेऊन सत्ता स्थापन करताना पाकिस्तान आणि चीन यांनी तालिबानला उघड मदत दिली आहेच पण आता अमेरिका सुद्धा अफगाणी नागरिकांच्या नावाखाली तालिबानला 64 दशलक्ष डॉलर्स म्हणजे 470 कोटींची मदत करणार असल्याची घोषणा केली गेली आहे. ही मदत वेळोवेळी वाढवून दिली जाणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.
तालिबानने अफगाणिस्थानच्या मोठ्या भूभागाचा ताबा घेतल्याला महिना होऊन गेला आहे आणि तालिबानने आता सरकार स्थापन केले आहे. चीन आणि पाकिस्तान तालिबानला मान्यता देणारे पहिले देश आहेत. पण ज्या अमेरिकेविरोधात तालिबान आजही धमक्या देत आहे, त्या अमेरिकेचा गुप्त अजेंडा आता उघड झाला आहे. मानवी अभियान या नावाखाली अमेरिका तालिबानला 470 कोटींची मदत देत असल्याचे संयुक्त राष्ट्रसंघात अमेरिकेच्या राजदूत लिंडा थॉम्पसन यांनी जाहीर केले आहे. अफगाणी नागरिकांची परिस्थिती गंभीर असल्याचे यावेळी त्या म्हणाल्या.
संयुक्त राष्ट्रसंघाचे महासचिव अंतोनियो गुतारेस यांनीही युद्धग-स्त अफगानिस्थानात नागरिक गेली कित्येक वर्षे असुरक्षित आणि त्रासाचे जीवन जगत आहेत आणि आता ही परिस्थिती अधिक खराब झाल्याचे सांगून आंतरराष्ट्रीय समुदायांनी अश्यावेळी त्याच्यासोबत उभे राहिले पाहिजे असे सांगितले आहे. संयुक्त राष्ट्रसंघ तालिबानला 2 कोटी डॉलर्सची आर्थिक मदत देणार आहे. त्या संदर्भात गुतारेस म्हणाले, अफगाणी नागरिक पूर्वीसुद्धा मानवीय मदतीवर अवलंबून होते आणि आता त्यात तालिबानी सत्तेची भर पडली आहे. तेथील नागरीकांना काम धंदा नाही, हाताशी रोख पैसा नाही, अन्न नाही. त्यामुळे घरातील सामान विकून त्यांच्यावर उदरभरण करण्याची पाळी आली आहे.