विराट कोहलीच्या कर्णधारपदाबाबत जय शहा यांचे मोठे वक्तव्य
नवी दिल्ली,
सध्या भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली जागतिक क्रिकेटमधील सर्वोत्तम फलंदाज या लौकिकाला साजेशा धावा होत नसल्यामुळे चिंतेत आहे. सध्या भारतीय संघाचे क्रिकेटच्या तिन्ही प्रकारात 32 वर्षीय कोहली नेतृत्व करतो. पण नेतृत्वाचे विभाजन करण्यास, तो उत्सुक असल्याची माहिती मिळत आहे. कोहलीने ऑॅस्ट्रेलियातील कसोटी विजयानंतर संघ व्यवस्थापनाशी याबाबत चर्चा केल्याचे समजते. त्यामुळे मर्यादित षटकांच्या नेतृत्वाची जबाबदारी रोहित शर्माकडे सोपवली जाऊ शकते. दरम्यान कर्णधारपदावरुन बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी मोठे वक्तव्य केले आहे.
विराट कोहली फलंदाजी आणि कसोटी क्रिकेटमधील वर्चस्व याकडे लक्ष केंद्रित करण्यासाठी आगामी टी-20 विश्वचषक क्रिकेट स्पर्धेनंतर मर्यादित षटकांच्या दोन्ही क्रिकेट प्रकारांचे कर्णधारपद सोडण्याची शक्यता आहे. दरम्यान टी-20 विश्वचषकासाठी फक्त एक महिना शिल्लक असून बीसीसीआयचे सचिव जय शहा यांनी कर्णधार विराट कोहलीच्या पाठीशी आपण भक्कमपणे उभे असल्याचे सांगितले आहे. संघ जोपर्यंत मैदानात चांगली कामगिरी करत आहे, तोपर्यंत कर्णधारपदात बदल करण्याचा प्रश्नच उद्भवत नसल्याचे जय शहा यांनी इंडियन एक्स्प्रेसशी बोलताना म्हटले आहे.
विराट कोहलीच्या कर्णधारपद आणि कामगिरीची जय शहा यांनी सांगड घातली आहे. विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय टी-20 मध्ये एकही मालिका गमावलेली नाही. पण आयसीसीच्या महत्वाच्या स्पर्धांमध्ये विराट कोहलीच्या नेतृत्वात भारतीय संघाला म्हणावे तसे यश मिळालेले नाही. विराट कोहली कर्णधार झाल्यापासून भारतीय संघ चॅम्पियन्स ट्रॉफी, टी-20 विश्वचषक किंवा एकदिवसीय विश्वचषक जिंकू शकलेला नाही.
जय शहा यांनी धोनीच्या निवडीसंबंधी प्रसारमाध्यमांशी बोलताना सांगितले होते की, मार्गदर्शकाच्या भूमिकेसाठी विचारणा केली असता धोनीने लगेच तयारी दर्शवली. धोनीने बीसीसीआयची ऑॅफर स्वीकारल्याचा मला आनंद आहे. भारतीय संघात योगदान देण्यासाठी धोनी उत्सुक आहे. धोनी रवी शास्त्री आणि सपोर्ट स्टाफसोबत काम करणार असून भारतीय संघाला दिशा देण्याचे काम करणार आहे.