कोव्हॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेकडून चालू आठवड्यात मिळणार मान्यता
नवी दिल्ली
कोव्हॅक्सिनचा डोस घेणार्या नागरिकांकरिता दिलासादायक बातमी आहे. जागतिक आरोग्य संघटनेकडून भारत बायोटेकच्या कोव्हॅक्सिनला चालू आठवड्यात मान्यता मिळणार असल्याचे सुत्राने सांगितले.
भारत बायोटेकने तिसर्या टप्प्यातील वैद्यकीय चाचण्यांचा केंद्रीय औषध दर्जा नियंत्रण संस्थेच्या (सीडीएससीओ) डाटा विषय तज्ज्ञांच्या समितीकडे सोपविला आहे. या आकडेवारीनुसार कोव्हॅक्सिन ही 77.8 टक्के कार्यक्षम असल्याचे आढळून आले आहे.
संयुक्त राष्ट्रसंघाकडून सकारात्मक संकेत
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेच्या प्रमुख शास्त्रज्ञ डॉ. सौम्या स्वामीनाथन यांची भेट घेतली होती. या भेटीत कोव्हॅक्सिनला मान्यता देण्याबाबत चर्चा झाली होती. जागतिक आरोग्य संघटनेच्या महासंचालक (लसीकरण) मॅरियन्न सिमाओ यांनी म्हटले, की संयुक्त राष्ट्रसंघाच्या आरोग्य संस्थेने कोव्हॅक्सिनचे मुल्यांकन केले आहे. सप्टेंबरच्या मध्यावधीमध्ये कोव्हॅक्सिनला मान्यता मिळेल, असा त्यांनी विश्वास व्यक्त केला आहे.
यापूर्वीच जागतिक आरोग्य संघटनेने कोरोनावर फायझर-बायोएनटेक, अॅस्ट्राझेनेका, जॉन्सन अँड जॉन्सन, मॉडर्ना आणि सिनोफार्म या लशींना मान्यता दिली आहे.
कोरोना लसीमुळे 12 महिन्यापर्यंत प्रतिकारक्षमता-
नुकतेच जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ स्वामीनाथन म्हणाल्या, की विज्ञान अजूनही प्रगती करत आहे. प्रत्येकाला बुस्टर डोस लागेल, अशी माहिती दाखविणारी आकडेवारी सद्यस्थितीला उपलब्ध नाही. लसीकरण झालेल्या लोकांच्या अभ्यासाचे निष्कर्ष प्रेरक आहेत. कोरोना लसीमुळे 8 ते 10 महिने किंवा 12 महिन्यापर्यंत प्रतिकारक्षमता शरीरात राहत असल्याचे आढळून आले आहे.
कोव्हॅक्सिनने संपूर्ण डाटा, सुरक्षितता, कार्यक्षमता आणि उत्पादनाची गुणवत्ता याची माहिती दिली आहे. यापूर्वीच भारत बायोटेकने डाटा दिला आहे. त्यामुळे कोव्हॅक्सिनच्या आपत्कालीन परवानगीबाबत 4 ते 6 आठवड्यामध्ये निर्णय होईल, असे जागतिक आरोग्य संघटनेच्या मुख्य शास्त्रज्ञ सौम्या स्वामीनाथन यांनी जुलैमध्ये सांगितले होते.