15 सप्टेंबरला पंतप्रधान मोदींच्या हस्ते होणार ‘संसद टीव्ही’चा शुभारंभ

नवी दिल्ली,

15 सप्टेंबरला संसद टीव्ही या वाहिनीचा शुभारंभ होणार आहे. 15 सप्टेंबर रोजी संसद भवनात आयोजित कार्यक्रमात पंतप्रधान नरेंद्र मोदी संसद टीव्हीचे औपचारिक उद्घाटन करतील. पंतप्रधान नरेंद्र मोदी, उप राष्ट्रपती व्यंकय्या नायडू, लोकसभा अध्यक्ष ओम बिरला या लोकार्पण सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. संसदेच्या राज्यसभा आणि लोकसभा या दोन्ही सभागृहांचे कामकाज दाखवणार्‍या लोकसभा टीव्ही आणि राज्यसभा टीव्हा दोन्ही वाहिन्यांचे सरकारने विलीनीकरण करण्याचा निर्णय घेतला होता.

लोकसभा आणि राज्यसभा या दोन्ही वाहिन्यांचे विलीनीकरण करून संसद टीव्ही अशी एकच वाहिनी असणार आहे. संसदेचे अधिवेशन सुरू असताना, संसद टीव्हीची दोन चॅनेल असतील, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. जेणेकरून लोकसभा आणि राज्यसभेचे कामकाज त्यांच्यावर सतत प्रसारित करता येईल. संसद टीव्हीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून सेवा निवृत्त सनदी अधिकारी रवि कपूर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांची नियुक्ती एका वर्षांसाठी करण्यात आली आहे. कपूर यांनी यापूर्वी विविध केंद्रीय मंत्रालयांमध्ये वेगवेगळ्या पदांवर सेवा बजावली आहे.

लोकसभा टीव्ही लोकसभेचे कामकाज दाखवण्यासाठी सुरू करण्यात आले होते. 1989मध्ये ही वाहिनी सुरू करण्यात आली होती. काही काळानंतर राष्ट्रपतींचे अभिभाषण, लोकसभेतील प्रश्नोतरांचा तास, शून्यप्रहर यांचे थेट प्रक्षेपण सुरू करण्यात आले. त्याचप्रमाणे लोकसभा टीव्ही या वाहिनीच्या धर्तीवर राज्यसभेचे कामकाज दाखवण्यासाठी राज्यसभा टीव्ही सुरू करण्यात आले. ही स्वतंत्र वाहिनी 2011मध्ये सुरू झाली.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!