अन्नपूर्णा देवी यांनी ’गुणवत्ता आणि शाश्वत शाळा: भारतातील शाळांमधील शिक्षण ’या संकल्पनेवरील तांत्रिक सत्राला संबोधित केले
नवी दिल्ली,
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 7 सप्टेंबर 2021 रोजी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून शिक्षक पर्वच्या उद्घाटनपर परिषदेला संबोधित केले. या परिषदेनंतर ’गुणवत्ता आणि शाश्वत शाळा: भारतातील शाळांमधील शिक्षण’ या संकल्पनेवरील तांत्रिक सत्र आयोजित केले होते. शिक्षण राज्यमंत्री अन्नपूर्णा देवी यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होत्या. सत्राच्या अध्यक्षपदी राष्ट्रीय शिक्षण धोरण समितीचे अध्यक्ष डॉ. के. कस्तुरीरंगन होते. एनसीईआरटीचे माजी संचालक प्रा.जे.एस. राजपूत आणि मंत्रालयाचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते.
यावेळी बोलताना अन्नपूर्णा देवी म्हणाल्या की, राष्ट्राचा विकास शिक्षणावर अवलंबून असतो कारण शिक्षण हे राष्ट्रीय चारित्र्य घडवण्याचे एक महत्त्वाचे साधन आहे. म्हणूनच मुलांची क्षमता वाढवणे आवश्यक आहे. शिक्षक आणि मुले एकत्रितपणे शिकणे महत्वाचे आहे, त्यांनी स्थानिक कौशल्ये देखील शिकली पाहिजेत आणि अनुभवावर आधारित शिक्षण आत्मसात केले पाहिजे जेणेकरून सध्याच्या काळात शिक्षण अधिक सुसंगत होईल यावर त्यांनी भर दिला.
कस्तुरीरंगन यांनी या महत्वपूर्ण परिषदेचे आयोजन केल्याबद्दल शिक्षण मंत्रालयाच्या प्रयत्नांचे कौतुक केले. पंतप्रधानांनी आगामी सत्रांसाठी चर्चेचा पाया रचला असे सांगून एनईपी 2020 प्रत्यक्षात साकार करण्यासाठी हाती घेतलेल्या उपक्रमांचे कौतुक केले.
प्रा.जे.एस. राजपूत म्हणाले, शिक्षकांप्रति आदर पुन:स्थापित करण्याची गरज आहे. ते पुढे म्हणाले की, शिक्षकांनी देखील लक्षात ठेवले पाहिजे की त्यांनी आधी मुलाची ओळख करून घ्यायला हवी, मुलाचे मन समजून घेतले पाहिजे आणि हे लक्षात ठेवले पाहिजे की काहीही शिकवता येत नाही तर शिकता येऊ शकते.
एनसीईआरटीचे संचालक प्रा.श्रीधर श्रीवास्तव यांनी परिषदेच्या समारोप सत्रात सहभागी झालेल्यांचे स्वागत केले. महामारीच्या परिस्थितीत एनसीईआरटीने ऑॅनलाईन पद्धतीने शिक्षणाला पाठिंबा देऊन, शिक्षकांना सहाय्य करण्यासाठी पर्यायी शैक्षणिक वेळापत्रक, प्रज्ञाता मार्गदर्शक तत्त्वे आणि निष्ठा 2.0 ऑॅनलाइन प्रशिक्षण मोड्यूल्स यासारख्या शिकणे-शिकवणे संसाधनांचा विकास करून एनसीईआरटीने बजावलेली सक्रिय भूमिका अधोरेखित केली.