संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी 2020 मधील संरक्षण मंत्रालयाच्या 20 सुधारणांवर ई-पुस्तिका केली प्रकाशित
नवी दिल्ली, 7 जून 2021
संरक्षण मंत्रालयाने वर्ष 2020 मध्ये हाती घेतलेल्या महत्त्वाच्या सुधारणांवर प्रकाश टाकणाऱ्या ’20 रिफॉर्म्स इन 2020’ या ई- पुस्तिकेचे प्रकाशन आज संरक्षण मंत्री राजनाथ सिंह यांनी केले. यावेळी संरक्षण राज्यमंत्री श्रीपाद नाईक आणि यावेळी संरक्षण क्षेत्रातील अन्य मान्यवर उपस्थित होते.
ही ई-पुस्तिका देशाच्या संरक्षण क्षेत्रातील उज्ज्वल भविष्यावरील महत्वपूर्ण दस्तऐवज असल्याचे राजनाथ सिंह यांनी यावेळी सांगितले. “पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या सक्षम नेतृत्वात संरक्षण क्षेत्र अधिकाधिक कार्यक्षम व सक्षम करण्याच्या सरकारच्या निर्धाराचे प्रतिबिंब ही पुस्तिका आहे,” असे त्यांनी सांगितले. संरक्षण मंत्रालयाने हाती घेतलेल्या सुधारणांमुळे आगामी काळात भारत संरक्षण क्षेत्रातील एक जागतिक शक्तिस्थळ होईल, असा विश्वास संरक्षणमंत्र्यांनी व्यक्त केला.
धोरणात्मक बदल, नवकल्पना आणि डिजिटल परिवर्तनाद्वारे सशस्त्र दलात अधिक समन्वय आणि आधुनिकीकरण घडवून आणण्यासाठी मंत्रालयाने वर्ष 2020 मध्ये हाती घेतलेल्या संरक्षण सुधारणांचा संक्षिप्त आढावा या पुस्तिकेत आहे. सुधारणांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘आत्मनिर्भर भारत ’ संकल्पनेवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. संरक्षण निर्यातीला चालना देण्यासाठी उद्योगाबरोबरचे वाढते सहकार्य, अधिक पारदर्शकतेसह संरक्षण अधिग्रहणांना गती देण्याचे उपाय, डिजिटल परिवर्तन, सीमेवरील पायाभूत सुविधा मजबूत करणे; सशस्त्र दलात महिलांचा वाढता सहभाग, नवनिर्मितीस चालना देण्यासाठी संशोधन व विकासातील परिवर्तन; एनसीसीचा दुर्गम ठिकाणी विस्तार आणि कोविड -19. विरोधात नागरी प्रशासनास मदत यांचा समावेश यात आहे.