देशातील 44 शिक्षकांचा राष्ट्रपतींच्या हस्ते राष्ट्रीय शिक्षक पुरस्काराने गौरव

नवी दिल्ली,

देशभरात आज शिक्षक दिन साजरा केला जात आहे. त्याच पार्श्वभूमीवर शिक्षण क्षेत्रात अमूल्य योगदान दिलेल्या देशभरातील 44 शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षक पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे. या सर्वांना राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पुरस्कार देऊन गौरवण्यात आलं आहे. देशातील कोरोना स्थिती अद्याप नियंत्रणात आली नसल्याने या वर्षीचा कार्यक्रम हा व्हिडीओ कॉन्फरन्सच्या माध्यमातून आयोजित करण्यात आला होता.

या प्रसंगी राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले की, ‘डॉ. सर्वपल्ली राधाकृष्ण हे एक आदर्श आणि विद्वान व्यक्ती म्हणून ओळखले जायचे. त्यांनी अनेक महत्वाची पदं भूषवली पण आजही त्यांची ओळख ही एक शिक्षक म्हणूनच आहे. आज मला देशातील शिक्षकांचा गौरव करताना अत्यंत आनंद होत आहे.‘ राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी यावेळी माजी राष्ट्रपती डॉ. एपीजे अब्दुल कलामांच्या कार्याचाही उल्लेख केला.

आपल्या देशातील शिक्षण हे नागरिकांमध्ये संवैधानिक मूल्यं रुजवणारं असावं असं राष्ट्रपती रामनाथ कोविंद म्हणाले. शिक्षकांनी आपल्या कार्यातून विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासावर भर द्यावा आणि एक आदर्श भारत घडवण्यात हातभार लावावा असंही आवाहन त्यांनी केलं.

राष्ट्रीय शिक्षक पुरस्कारासाठी निवड ही सुरुवातीला जिल्हास्तरीय पातळीवरून सुरु होते, त्यानंतर ती राज्यस्तरीय पातळीवर केली जाते. शेवटी सर्व राज्यांतून आलेल्या शिफारसीवरून देश पातळीवर या शिक्षक पुरस्काराच्या मानकरींची निवड केली जाते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!