देशातील सक्रिय रुग्णसंख्या 4 लाखांवर; 24 तासांत 45 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद
नवी दिल्ली
भारतात सध्या दररोज जवळपास 45 हजार नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. आज शुक्रवारी सकाळी आरोग्य मंत्रालायानं जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 45,352 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली होती. त्यापूर्वी एक दिवसाआधी देशात 47,092 दैनंदिन रुग्णांची नोंद करण्यात आली होती. अशातच गेल्या 24 तासांत 366 कोरोना रुग्णांनी जीव गमावला आहे. तर 34,791 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनामुक्त रुग्णांहून अधिक दैनंदिन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात येत आहे. कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या वाढून आतापर्यंत चार लाखांपर्यंत पोहोचली आहे. यामध्ये भारत आता सातव्या स्थानी पोहोचला आहे.
भारतीत कोरोनाची एकूण आकडेवारी
कोरोना महामारीच्या सुरुवातीपासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 29 लाख 3 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 39 हजार 895 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महत्त्वाची बाब म्हणजे, 3 कोटी 20 लाख 63 हजार रुग्ण उपचारानंतर कोरोनामुक्त झाले आहेत. देशात कोरोनाच्या सक्रिय रुग्णांची संख्या चार लाख आहे. एकूण 3 लाख 99 हजार 778 रुग्ण अद्याप कोरोनाशी झुंज देत आहेत.
देशातील कोरोनाची सद्यस्थिती :
कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 29 लाख 03 हजार 289
एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 20 लाख 63 हजार 616
सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 99 हजार 778
एकूण मृत्यू : चार लाख 39 हजार 895
एकूण लसीकरण : 67 कोटी 9 लाख 59 हजार लसीचे डोस