आयुष मंत्रालयाने आज देशभरातील 45 हून अधिक ठिकाणांहून “आयुष आपके द्वार” ही मोहीम सुरू केली
डॉ. मुंजापारा महेंद्रभाई यांनी आयुष मंत्रालयात “आयुष आपके द्वार” मोहीम सुरू केली
21 राज्यांमधील 44 ठिकाणांहून 2 लाख औषधी वनस्पतींची रोपे उद्घाटन समारंभात वितरित केली जाणार आहेत
आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल हे मुंबईतून या मोहिमेचा प्रारंभ करणार
नवी दिल्ली, 3 सप्टेंबर 2021
आयुष मंत्रालयाने आज देशभरातील 45 हून अधिक ठिकाणांहून “आयुष आपके द्वार” ही मोहीम सुरू केली. आयुष विभागाचे राज्यमंत्री डॉ मुंजापारा महेंद्रभाई यांनी कर्मचाऱ्यांना औषधी वनस्पतींचे वाटप करून आयुष भवनातून मोहिमेचा शुभारंभ केला. यावेळी डॉ.मुंजापारा यांनी उपस्थितांना संबोधित केले आणि औषधी वनस्पती दत्तक घेण्याचे आणि कुटुंबाच्या सदस्याप्रमाणे त्याची काळजी घेण्याचे आवाहन केले.
आजच्या उद्घाटन समारंभात एकूण 21 राज्ये सहभागी होत असून 2 लाखांहून अधिक रोपे वितरित केली जातील. आयुष मंत्री सर्बानंद सोनोवाल हे मुंबईतून या मोहिमेचा प्रारंभ करणार आहेत. एका वर्षात देशभरातील 75 लाख कुटुंबांना औषधी वनस्पतींची रोपे वितरित करण्याचे या मोहिमेचे उद्दिष्ट आहे. औषधी वनस्पतींमध्ये तेजपत्ता, स्टीव्हिया, अशोक, जटामांसी, गुळवेल/गुडुची, अश्वगंधा, कुमारी, शतावरी, लेमनग्रास, गुग्गुळ, तुळस, सर्पगंधा, कलमेघ, ब्राह्मी आणि आवळा यांचा समावेश आहे.
आयुष सचिव वैद्य राजेश कोटेचा, आयुषचे विशेष सचिव पी.के. पाठक, आयुषचे सहसचिव डी सेंथिल पांडियन आणि इतर वरिष्ठ अधिकारी या कार्यक्रमाला उपस्थित होते.
स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव अंतर्गत, वाय -ब्रेक अॅपचा शुभारंभ , रोगप्रतिबंधक आयुष औषधांचे वितरण यासह इतर अनेक कार्यक्रम याआधीच सुरू करण्यात आले आहेत. शालेय आणि महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी व्याख्यानमाला उद्या आयोजित केली जाईल आणि 5 सप्टेंबर रोजी Y-Break अॅपवरील वेबिनार आयोजित केले जाणार आहे.