जागतिक आरोग्य संघटनेने लसीलाही न जुमानणार्या, ‘डेल्टा’पेक्षा वेगाने प्रादुर्भाव होणार्या ‘म्यू व्हेरिएंट’संदर्भात दिला इशारा
नवी दिल्ली,
दीड वर्षांहून अधिक कालावधी जगभरामध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव होऊन झाला आहे. सध्या जगातील अनेक देशांमध्ये लसीकरण मोहीम सुरु आहे. पण असे असतानाही या व्हायरसचे नव नवीन उपप्रकार म्हणजेच व्हेरिएंट समोर येत असल्यामुळे धोका अद्याप कायम असल्याची परिस्थिती पहायला मिळत आहे. आता कोरोनाच्या नवीन व्हेरिएंटसंदर्भात जागतिक आरोग्य संघटनेने धोक्याचा इसारा दिला आहे.
कोलंबियामध्ये आढळून आलेल्या या व्हायरसच्या नव्या व्हेरिएंटचे म्यू असे नाव आहे. या व्हायरसचे बी वन 621 असे शास्त्रीय नाव आहे. यासंदर्भात पहिल्यांदा जानेवारीमध्ये माहिती समोर आली होती. या व्हायरसचा संसर्ग झालेल्या रुग्णांची संख्या ही चार हजारांच्या आसपास असून ते जगभरातील 40 वेगवेगळ्या देशांमध्ये आढळून आले आहेत.
मागील काही महिन्यांपासून जागतिक आरोग्य संघटना म्यू व्हेरिएटवर लक्ष ठेऊन आहे. जागतिक आरोग्य संघटनेने दिलंल्या माहितीनुसार या व्हायरस विरोधात प्रतिबंधक लसही काही कामाची नसून तो लसीचा प्रभाव नष्ट करण्यास सक्षम आहे. त्याचबरोबर या व्हायरसचा संसर्गही फार वेगाने होतो. जागतिक आरोग्य संघटनेने यासंदर्भात अभ्यास करण्याची गरज असल्याचे म्हटले आहे. जागतिक आरोग्य संघटनेने या व्हायरसचा व्हेरिएंट ऑॅफ इन्स्ट्रेस्ट प्रकारामध्ये समावेश केला आहे. म्हणजेच या व्हायरसच्या प्रादुर्भावाचा वेग आणि इतर गोष्टींवर अधिक बारकाईने लक्ष ठेवले जाणार आहे.
आपल्या अहवालामध्ये जागतिक आरोग्य संघटनेने, जानेवारी 2021 मध्ये पहिल्यांदा कोलंबियामध्ये म्यू व्हेरिएंट आढळून आल्यानंतर म्यू व्हेरिएंटच्या रुग्णसंख्येत वाढ दिसून आल्याचे म्हटले आहे. कोलंबियामधून हा व्हेरिएंट दक्षिण अमेरिका, यूरोपमधील अनेक देशांमध्ये पोहचला आहे. या व्हायरसच्या संसर्गाचे प्रमाण हे जागतिक स्तरावर एकूण संसर्गाच्या 0.1 टक्का एवढे आहे. डेल्टा व्हेरिएंटबरोबरच म्यु व्हेरिएंटवरही आता जागतिक आरोग्य संघटना विशेष लक्ष देऊन आहे. सध्या डेल्टासोबतच अल्फा, बीटा आणि गामा व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑॅफ कंन्सर्न म्हणजेच काळजी करण्यासारखे आणि धोकादायक असे कोरोनाचे उपप्रकार म्हणून जागतिक आरोग्य संघटेनेने वर्गिकृत केले आहे. त्याचबरोबरच म्यूसोबत इओटा, कापा आणि लॅम्ब्डा व्हेरिएंटला व्हेरिएंट ऑॅफ इन्स्टेस्टच्या यादीत टाकले आहे.