रशियात होणार्‍या झपाड 2021 या बहुराष्ट्रीय सैनिकी सरावात भारतीय लष्कर भाग घेणार

नवी दिल्ली

भारतीय लष्करातील 200 जवानांची तुकडी रशियातील निझनीय येथे 3 ते 16 सप्टेंबर 2021 या कालावधीत होणार्‍या झपाड 2021 या बहुराष्ट्रीय लष्करी सरावात भाग घेणार आहे.

झपाड 2021 हा रशियाच्या सशस्त्र दलांचा महत्त्वाच्या पातळीवरील सराव आहे आणि त्यात दहशतवाद्यांविरोधातील कारवाईवर प्रामुख्याने लक्ष केंद्रित केले जाईल. युरेशिया आणि दक्षिण आशियाई प्रदेशातील एक डझनाहून अधिक देश या महत्त्वपूर्ण सरावात भाग घेणार आहेत.

भारतीय लष्करातर्फे या सरावात भाग घेणारा नागा बटालियन संघ सर्व शस्त्रांनी सुसज्ज अशा एकत्रित कृती दलाचे प्रदर्शन करणार आहे. दहशतवाद विरोधी कारवाईचे नियोजन आणि अंमलबजावणी यासाठी एकत्र येताना, या सरावात सहभागी होणार्‍या सर्व देशांदरम्यान लष्करी तसेच धोरणात्मक नातेसंबंध अधिक उत्तमपणे जोपासलेले असावेत या उद्देशाने या लष्करी सरावाचे आयोजन करण्यात आले आहे.

या सरावात भाग घेणार्‍या भारतीय लष्कराच्या तुकडीला कठोर प्रशिक्षण कार्यक्रम पूर्ण करावा लागला असून त्यात यांत्रिक, हवाई आणि हेलिबॉर्न, दहशतवादविरोधी कारवाई, युद्धजन्य परिस्थिती आणि गोळीबार यांच्यासह पारंपरिक कारवायांच्या सर्व पैलूंचा समावेश करण्यात आला होता.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!