भारतात प्रशिक्षण घेतलेले अफगाणी सेना अधिकारी अडचणीत
नवी दिल्ली
अफगाणीस्तान मध्ये तालिबानी राजवट आल्यामुळे ज्या अफगाणी पुरुष, महिलांनी भारतातील संरक्षण संस्थातून लष्करी शिक्षण घेतले आहे, त्या सार्यांच्या जीवाला आता धोका निर्माण झाला आहे. भारतातील आयआयएम, एनडीए अश्या संस्थातून दरवर्षी अफगाणी विद्यार्थी लष्करी शिक्षण घेण्यासाठी येत असतात आणि हे प्रशिक्षण घेऊन आपल्या देशाच्या सैन्यात दाखल होतात. आता देश स्वतंत्र न राहिल्याने या लष्करी अधिकार्यांना तालिबान आणि पाकिस्तान या दोघांकडूनही धोका निर्माण झाला आहे.
या सैनिकांनी भारताकडे मदतीची याचना केली असून भारत सरकारवर त्यासाठी पूर्ण विश्वास दर्शविला आहे. एका लष्करी अधिकार्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर दिलेल्या माहितीनुसार तालिबानी सेनेने हल्ला चढविला तेव्हा त्यांच्या कडे बायोमेट्रिक पॅड होती. यामुळे या पॅड वर नुसते बोट ठेवले तरी आमची सारी माहिती त्यांना मिळणार आहे. आमच्यापैकी चार जण ठार झाले आहेत आणि आम्ही सुरक्षित जागी आश्रय घेतला आहे. अनेक जण लपून राहिले आहेत.
अन्य एका अधिकार्याच्या म्हणण्यानुसार तालिबानी आमच्या सर्व हालचालींवर नजर ठेऊन आहेत. ते आम्हाला जिवंत सोडणार नाहीत. आम्ही भारतात लष्करी प्रशिक्षण घेतल्यामुळे पाकिस्तानीपासून सुद्धा आम्हाला धोका आहे. अमेरिका, जर्मनी, ऑस्ट्रेलियात प्रशिक्षण घेतलेले अनेक अफगाणी सैनिक आहेत पण त्यांना त्या देशांनी अफगाणीस्तान बाहेर काढले आहे. भारत आमची मदत करेल असा विश्वास वाटतो.