महाराष्ट्र आणि गोव्यात प्राप्तिकर विभागाचे छापे
नवी दिल्ली
प्राप्तिकर विभागाने 25.08.2021 रोजी महाराष्ट्र आणि गोवा येथील उद्योग समूहाशी संबंधित ठिकाणांवर छापे टाकत जप्तीची कारवाई केली.हा समूह पुणे, नाशिक, अहमदनगर आणि गोवा येथील एक नामांकित पोलाद उत्पादक आणि व्यापारी आहे. 44हून अधिक ठिकाणी छापे टाकण्यात आले.
छापे आणि जप्तीच्या मोहिमेदरम्यान, अनेक आक्षेपार्ह कागदपत्रे, दस्तऐवजांचे कागद आणि डिजिटल पुरावे जप्त करण्यात आले.
छापे टाकून केलेल्या कारवाई दरम्यान सापडलेल्या पुराव्यांमुळे हे उघड झाले आहे की, हा समूह विविध ’बनावट पावत्या जारी करणार्यांकडून भंगाराची आणि स्पंज आयर्नची खरेदी करण्याच्या फसवणुकीच्या प्रकारांमध्ये गुंतला होता. या कारवाई दरम्यान बनावट पावत्या जारी करणार्यांच्या ठिकाणांवरही छापे टाकण्यात आले. अशा पावत्या देणार्यांनी कबूल केले आहे की, त्यांनी केवळ देयके पुरवली मात्र ज्याची देयके होती ते साहित्य पुरवलेले नाही.खरोखर खरेदी केल्याचे दाखविण्यासाठी आणि जीएसटी इनपुट क्रेडीटचा दावा करण्यासाठी बनावट ई-वे देयके देखील निर्माण करण्यात आली. पुण्याच्या जीएसटी प्राधिकरणाच्या सक्रीय पाठिंब्याने, बनावट ई-वे देयके ओळखण्यासाठी ‘व्हेईकल मुव्हमेंट ट्रॅकिंग अॅप‘ चा वापर करण्यात आला.या समूहाने दाखवलेली एकूण बनावट खरेदी, आतापर्यंत सुमारे 160 कोटी रुपयांची असल्याचे निष्पन्न झाले आहे.
विविध ठिकाणांवरून 3 कोटी रुपयांची बेहिशेबी रोकड आणि 5.20 कोटी रुपयांचे दागिने जप्त करण्यात आले आहेत. 1.34 कोटी रुपयांचे 194 किलो चांदीच्या बेहिशेबी वस्तूंही या कारवाई दरम्यान सापडल्या. करपात्र व्यक्तीने हे स्वीकारले असून हे अतिरिक्त उत्पन्न म्हणून घोषित केले आहे. या कारवाई दरम्यान आतापर्यंत, बेहिशेबी रोकड आणि दागिने, कमी आणि अतिरिक्त साठा आणि बोगस खरेदी यांचा समावेश असलेले 175.5 कोटी रुपयांचे बेहिशेबी उत्पन्न सापडले आहे.