देशात एका दिवसातील लसीकरणाचा उच्चांक! दिवसभरात 79 लाख नागरिकांनी घेतली लस
नवी दिल्ली,
देशात शुक्रवारी (27 ऑगस्ट) एकाच दिवशी जवळपास 79 लाख लोकांचे संध्याकाळी पाच पर्यंत कोविड-19 लसीकरण करण्यात आले असून आतापर्यंतचा हा उच्चांक आहे. एका दिवसातील आतापर्यंतचा हा उच्चांक असल्याची माहिती केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री डॉ. भारती पवार यांनी टवीट करत दिली आहे. आतपर्यंत एका दिवसातील लसीकरणाच्या आकडेवारीतील ही सर्वात जास्त संख्या आहे.
दरम्यान 21 ते 27 ऑगस्ट या आठवड्यात देशातील 4.5 कोटी नागिरकांचे लसीकरण करण्यात आले आहे. हा देखील आतापर्यंतचा उच्चांक आहे. ऑगस्ट महिन्यात लसीकरणाचा उच्चांक गाठण्यात आला आहे. ऑगस्ट महिन्यात 15 कोटीहून अधिक कोरोनावरील लसीचे डोस देऊन लसीकरणाचा विक्रम गाठला आहे.
देशात कोरोनाच्या तिसर्या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच अजून दुसर्या लाटेचा कहर काही केल्या नियंत्रणात येताना दिसत नाही. त्यामुळे जास्तीत जास्त नागरिकांचे लसीकरण करण्याकडे केंद्र सरकारचा जोर आहे. देशात गेल्या दोन दिवसापासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे केरळमध्ये वाढलेली रुग्णसंख्या. केरळमध्ये सध्या दैनंदिन कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. केरळमध्ये काल एकाच दिवशी तब्बल 30 हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली तर 162 जणांना जीव गमवावा लागला.
देशात सलग दुसर्या दिवशी 40 हजाराहून जास्त रुग्णसंख्येची भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 44 हजार 658 नव्या रुग्णांची भर पडली असून 496 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. काल 32 हजार 988 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी बुधवारी 46 हजार 164 रुग्णांची भर पडली होती तर 607 जणांचा मृत्यू झाला होता.