केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री स्मृती इराणी यांनी महिला सक्षमीकरणावरील पहिल्या जी 20 मंत्रिस्तरीय परिषदेला संबोधित केले
नवी दिल्ली,
केंद्रीय महिला आणि बालविकास मंत्री, स्मृती इराणी यांनी महिलांच्या सक्षमीकरणावरील पहिल्या जी -20 मंत्रिस्तरीय परिषदेला संबोधित केले. या परिषदेचे आयोजन इटलीच्या सांता मार्गेरीटा लिगर येथे आभासी स्वरूपात करण्यात आले होते. केंद्रीय मंत्र्यांनी परस्पर सहकार्याद्वारे लिंगभाव आणि महिला केंद्रित समस्या सोडवण्याच्या भारताच्या वचनबद्धतेचा पुनरुच्चार केला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतातील लिंगभाव समानता वाढवण्यासाठी, उत्तम आरोग्य सेवा सुनिश्चित करण्यासाठी आणि महिलांची सुरक्षा बळकट करण्यासाठी हाती घेण्यात आलेल्या विविध उपक्रमांचा त्यांनी उल्लेख केला.
स्मृती इराणी यांनी आपल्या भाषणादरम्यान भागीदार देशांमधील लिंगभाव समानता आणि महिला सक्षमीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी भारत जी -20 सह एकजुटीने उभा असल्याची ग्वाही दिली आणि सहकार्य आणि समन्वयाद्वारे लिंगभाव समानता आणि महिला सशक्तीकरणाला प्रोत्साहन देण्यासाठी सर्व संबंधित मंचांवर जी 20 च्या लिंगभाव समानता मंत्र्यांबरोबर त्या सहभागी झाल्या.
महिला सक्षमीकरणावरील जी 20 परिषदेने एसटीईएम, आर्थिक आणि डिजिटल साक्षरता, पर्यावरण आणि शाश्वतता यासह सर्व क्षेत्रात महिला आणि मुलींच्या समानतेचे आणि विकासाचे उद्दिष्ट पुढे नेण्यासाठी समान उद्दिष्टे आणि सामायिक जबाबदार्या मान्य केल्या.