लखनऊच्या कॅप्टन मनोज कुमार पांडे सैनिक शाळेच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या समारोप समारंभाला राष्ट्रपती उपस्थित
नवी दिल्ली,
राष्ट्रपती राम नाथ कोविंद लखनऊ येथील कॅप्टन मनोज कुमार पांडे सैनिक शाळेच्या हीरक महोत्सवी समारंभाच्या समारोप समारंभाला उपस्थित राहिले आणि त्यांनी संबोधितही केले. यावेळी त्यांनी उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री डॉ.संपूर्णानंद यांच्या पुतळ्याचे अनावरण केले; डॉ.संपूर्णानंद यांच्या नावाने बांधण्यात आलेल्या प्रेक्षागृहाचे त्यांनी उद्घाटन केले. शाळेची क्षमता दुपटीने वाढवण्याच्या विविध प्रकल्पांची तसेच मुलींसाठी वसतीगृह बांधण्याच्या प्रकल्पांची त्यांनी पायाभरणी केली.
यावेळी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की, कॅप्टन मनोज कुमार पांडे सैनिक शाळा ही देशातील पहिली सैनिकी शाळा आहे. मुलींना सैनिकी प्रशिक्षण देणारी ही पहिली सैनिक शाळा आहे याचा त्यांनी आवर्जून उल्लेख केला. तसेच ही पहिली सैनिक शाळा असेल जिथल्या मुली या वर्षी एनडीएची परीक्षा देतील. ते म्हणाले की, या शाळेतील शिक्षक आणि विद्यार्थ्यांनी उत्कृष्टतेची परंपरा प्रस्थापित केली आहे आणि इतर सैनिक शाळांसाठीही उत्तम मानके निश्चित केली आहेत .
कॅप्टन मनोजकुमार पांडे यांचे स्मरण करताना राष्ट्रपती म्हणाले की, देशाच्या सीमांच्या रक्षणासाठी त्यांनी दिलेल्या बलिदानाबद्दल आपण त्यांचे आणि त्यांच्या कुटुंबाचे सदैव ॠणी राहू. कॅप्टन मनोज कुमार पांडे यांनी शौर्य आणि त्यागाची एक अद्भुत आणि अजरामर गाथा लिहिली आहे. सर्व सैनिक शाळांमधील विद्यार्थ्यांमधले ते एकमेव सैनिक आहेत ज्यांना परमवीर चक्राने गौरवण्यात आले आहे.
डॉ.संपूर्णानंद यांचे स्मरण करताना राष्ट्रपती म्हणाले की, जेव्हा भारत स्वतंत्र झाला, तेव्हा त्यांच्यासारख्या स्वातंत्र्यसैनिकांनी अशा पिढ्यांना तयार करण्याचा विचार केला ज्या प्रदीर्घ संघर्षानंतर मिळालेल्या अनमोल स्वातंत्र्याचे रक्षण करू शकतील आणि एक चांगला समाज घडवू शकतील.
राष्ट्रपती म्हणाले की डॉ.संपूर्णानंद आणि कॅप्टन मनोजकुमार पांडे सारख्या व्यक्तिमत्त्वांमध्ये समान आदर्शमूल्ये असतात.