सलग दुसर्‍या दिवशी 40 हजाराहून जास्त रुग्णांची भर, सक्रिय रुग्णसंख्येत 11 हजारांची भर

नवी दिल्ली,

देशात कोरोनाच्या तिसर्‍या लाटेची शक्यता वर्तवण्यात येत असतानाच अजून दुसर्‍या लाटेचा कहर काही केल्या नियंत्रणात येताना दिसत नाही. देशात सलग दुसर्‍या दिवशी 40 हजाराहून जास्त रुग्णसंख्येची भर पडली आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासात 44 हजार 658 नव्या रुग्णांची भर पडली असून 496 जणांना आपला जीव गमवावा लागला आहे. काल 32 हजार 988 जण कोरोनामुक्त झाले आहेत. त्या आधी बुधवारी 46 हजार 164 रुग्णांची भर पडली होती तर 607 जणांचा मृत्यू झाला होता.

देशातील कोरोनाची रुग्णसंख्या वाढण्याचे सर्वात महत्वाचे कारण म्हणजे केरळमध्ये वाढलेली रुग्णसंख्या. केरळमध्ये काल एकाच दिवशी तब्बल 30 हजार नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली तर 162 जणांना जीव गमवावा लागला. केरळातील एकूण रुग्णसंख्या ही आता 39.13 लाख इतकी झाली आहे. तर

देशातील सध्याची कोरोनास्थिती :

कोरोनाची एकूण आकडेवारी : तीन कोटी 26 लाख 3 हजार 188

एकूण कोरोनामुक्त रुग्ण : तीन कोटी 18 लाख 21 हजार 428

सक्रिय रुग्णांची एकूण आकडेवारी : तीन लाख 44 हजार 899

एकूण मृत्यू : चार लाख 36 हजार 861

एकूण लसीकरण : 61 कोटी 22 लाख 8 हजार डोस

राज्यातील स्थिती

राज्यात गुरुवारी 5,108 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 4 हजार 736 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 62 लाख 52 हजार 150 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.04 टक्के आहे.

राज्यात काल 159 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.12 टक्के झाला आहे. तब्बल 28 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये आज एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 50 हजार 393 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 13,085 अ‍ॅक्टिव्ह रुग्ण आहेत. राज्यातील एकूण 17 जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. जळगाव (40), नंदूरबार (1), धुळे (16), जालना (85), परभणी (21), हिंगोली (60), नांदेड (34), अमरावती (94), अकोला (20), वाशिम (02), बुलढाणा (39), यवतमाळ (01), नागपूर (77), वर्धा (5), भंडारा (9), गोंदिया (3), गडचिरोली (29) या सतरा जिल्ह्यात अ‍ॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे.

मुंबईत गेल्या 24 तासात 397 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद

मुंबईत गेल्या 24 तासात 397 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 507 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,21,157 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात सात रुग्णाचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 2736 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1825 दिवसांवर गेला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!