भारतातील महिला उद्योजकतेला चालना देण्यासाठी नीति आयोगाची सिस्कोसोबत भागीदारी
नीति आयोगाच्या महिला उद्योजकता मंचाचा (WEP) पुढचा टप्पा, सिस्कोचे तंत्रज्ञान आणि देशभरातील महिलांच्या मालकीचे उद्योग आणखी वाढवण्यासाठी भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेबरोबर काम करण्याच्या अनुभवाचा लाभ उठवेल.
नवी दिल्ली, 26 ऑगस्ट 2021
देशभरातील महिला उद्योजकांना सक्षम करण्याच्या सामायिक वचनबद्धतेच्या पार्श्वभूमीवर नीती आयोग आणि सिस्कोने आज महिला उद्योजकता मंचाचा पुढील टप्पा सुरू केला. “WEP Nxt” शीर्षक असलेला नीति आयोगाच्या महत्वाकांक्षी मंचाचा हा पुढचा टप्पा सिस्कोचे तंत्रज्ञान आणि देशभरातील महिलांच्या मालकीचे उद्योग आणखी वाढवण्यासाठी भारताच्या स्टार्टअप परिसंस्थेबरोबर काम करण्याच्या अनुभवाचा लाभ उठवेल.
अमिताभ कांत (सीईओ नीति आयोग), अण्णा रॉय (नीति आयोगाचे वरिष्ठ सल्लागार ), मारिया मार्टिनेझ (ईव्हीपी आणि सीओओ, सिस्को), डेझी चित्तीलापिल्ली (अध्यक्ष, सिस्को इंडिया आणि सार्क) आणि हरीश कृष्णन, (व्यवस्थापकीय संचालक, सार्वजनिक व्यवहार आणि धोरणात्मक सहभाग, सिस्को इंडिया आणि सार्क) या कार्यक्रमाला उपस्थित होते.
महिला उद्योजकता मंचाचा प्रारंभ सुरुवातीला नीति आयोगाने 2017 मध्ये केला. हे अशा प्रकारचे पहिले एकीकृत पोर्टल आहे जे विविध पार्श्वभूमी असलेल्या महिलांना एकत्र आणते.
तसेच या उपक्रमाचा एक भाग म्हणून, नॅसकॉम फाउंडेशन, सत्व कन्सल्टिंग आणि डीअसरा फाउंडेशनच्या सहकार्याने, वैयक्तिक आणि उद्योग स्तरावर महिला उद्योजकांना भेडसावणाऱ्या आव्हानांना सामोरे जाण्यासाठी तंत्रज्ञान-आधारित अनुभव आणि सहभाग सक्षम करेल आणि विकासाच्या नव्या संधी निर्माण करेल.
“सहाव्या आर्थिक जनगणनेनुसार, देशातील एकूण उद्योजकांच्या 13.76% म्हणजेच देशातील 58.5 दशलक्ष उद्योजकांपैकी 8.05 दशलक्ष उद्योजक महिला आहेत. भूतकाळात ही एक गमावलेली संधी असू शकते, परंतु मला विश्वास आहे की केंद्र सरकार आणि खाजगी क्षेत्र महिला उद्योजकता मंच सारख्या उपक्रमांद्वारे भागीदारी करत असल्यामुळे आपण नवभारतचे स्वप्न साकार करू शकू – जिथे पुरुष आणि स्त्रियांना विकासात सहभागी होण्याची समान संधी असेल”, असे नीति आयोगाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अमिताभ कांत म्हणाले.
सिस्कोच्या मुख्य कार्यकारी अधिकारी मारिया मार्टिनेझ म्हणाल्या, “आपण अर्थव्यवस्था सावरण्याच्या नवीन टप्प्यात प्रवेश करत असून वैविध्यपूर्ण, सर्वसमावेशक आणि डिजिटली-सक्षम जग अधिक समृद्ध बनवण्याबाबत सहमती होताना दिसत आहे .”
नीति आयोगाच्या महिला उद्योजकता मंचाबद्दल
महिला उद्योजकता मंच (WEP) हा नीती आयोगाचा महत्वाकांक्षी उपक्रम असून महिला उद्योजकांसाठी अशा प्रकारचे एकीकृत माहिती पोर्टल आहे. उद्योग संबंध आणि विद्यमान कार्यक्रम आणि सेवांविषयी जागरूकता सुधारण्यासाठी तसेच मदत, शिक्षण संसाधने, निधी उभारणीच्या संधी आणि मार्गदर्शन उपलब्ध करून देते. परिसंस्थेतील माहिती विषमता दूर करणारा मंच बनण्याच्या व्यापक उद्देशाने, महिला उद्योजकता मंच हा महिला उद्योजकांशी संबंधित माहिती आणि सेवांसाठी वन स्टॉप सोल्यूशन म्हणून काम करतो. या मंचावर सध्या 16,000 पेक्षा जास्त नोंदणीकृत वापरकर्ते आणि 30 भागीदार आहेत. निधी आणि आर्थिक व्यवस्थापन, इन्क्युबेशन, कर आणि अनुपालन सहाय्य, उद्योजक कौशल्य आणि मार्गदर्शन, समुदाय आणि नेटवर्किंग आणि विपणन सहाय्य या सहा क्षेत्रांवर ते लक्ष केंद्रित करते.