‘स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव’ च्या अनुषंगाने टेलिमेडिसिन, कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डिजिटल आरोग्य क्षेत्रातील 75 स्टार्ट-अप्सना पाठबळ देण्यासाठी सरकार विशेष प्रोत्साहन देणार

नवी दिल्ली,

यावर्षी 15 ऑॅगस्टपासून साजर्‍या होत असलेल्या ‘स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवा’ च्या अनुषंगाने टेलिमेडिसिन, डिजिटल आरोग्य क्षेत्र आणि कृत्रिम बुद्धिमत्ता (एआय) क्षेत्रातील 75 स्टार्ट-अप्सना पाठबळ देण्यासाठी सरकार लवकरच एक विशेष प्रोत्साहन योजना सुरू करणार आहे.

भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान विभागाअंतर्गत सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम असलेल्या जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषद (बीआयआरएसी) द्वारे ही योजना सुरु करण्यात येईल.

केंद्रीय विज्ञान आणि तंत्रज्ञान राज्यमंत्री (स्वतंत्र प्रभार) जितेंद्र सिंह यांनी आज ही घोषणा केली. भारत सरकारच्या जैव तंत्रज्ञान मंत्रालयाअंतर्गत असलेल्या जैव तंत्रज्ञान विभागाच्या सचिव डॉ रेणू स्वरूप यांच्या अध्यक्षतेखालील जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेच्या सदस्यांना यासंदर्भातील सूचना देण्यात आल्या आहेत.

कोविड -19 महामारीमुळे उद्भवलेल्या आव्हानांना जगभरातील मानवजात सामोरी जात असताना, आरोग्य क्षेत्रातील सर्वोत्तम 75 नवकल्पना शोधण्याचे मोठे आव्हान, स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षातील सर्वात महत्वाचे कार्य आहे,कारण यामुळे आरोग्यक्षेत्रात संशोधन आणि विकासाला प्रोत्साहन मिळणार आहे, असे गौरवोद्गार जितेंद्र सिंह यांनी जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेच्या संचालक मंडळाशी संवाद साधताना काढले.

खाजगी क्षेत्रांपेक्षा एक पाऊल पुढे राहत, स्टार्टअप्सना पाठबळ देतांना संबंधित कार्यवाही लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करण्याचे निर्देश डॉ.जितेंद्र सिंह यांनी वरिष्ठ अधिकार्‍यांना केले. कोविड -19 च्या संकटावर मात करण्यासाठी विविध पैलूंवर लक्ष केंद्रित करण्यासाठी स्टार्टअप अर्जदारांना विशिष्ट संकल्पना द्यावी अशी सूचनाही त्यांनी जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेच्या संचालक मंडळाला केली.

तत्पूर्वी, डॉ जितेंद्र सिंह यांनी जैवतंत्रज्ञान उद्योग संशोधन सहाय्य परिषदेचे ई-कार्यालयाचे उद्घाटन केले तसेच, बीआयआरएसीचे ई-कार्यालय सॉफ्टवेअरही आज त्यांच्या हस्ते सुरु करण्यात आले. बीआयआरएसी ई-कार्यालय लाइट सॉफ्टवेअर 1 ऑॅगस्ट 2021 पासून एनआयसीएसआय सर्व्हरवर चाचणीसाठी देण्यात आले आहे. डिजिटल इंडिया अभियान हा महत्वाकांक्षी प्रकल्प असून हा प्रकल्प पारदर्शकता आणि सुशासनाला प्रोत्साहन देऊन देशाच्या समृद्धीला चालना देईल, असे जितेंद्र सिंह म्हणाले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!