काबुलमध्ये विमानाचे अपहरणनाट्य; युक्रेनचे प्रवासी नेले इराणमध्ये!

नवी दिल्ली

तालिबानींनी सत्ता ताब्यात घेतल्यानंतर अफगाणिस्तानमध्ये अनागोंदी सुरुच आहे. अफगानिस्तानची  राजधानी काबुलमधून युक्रेनच्या विमानाचे अज्ञात लोकांनी अपहरण  केले आहे. हे विमान युक्रेनच्या नागरिकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यासाठी अफगाणिस्तानात पोहोचले होते.

युक्रेनच्या उप परराष्ट्रमंत्री येवगेनी येनिन म्हणाल्या, की युक्रेनच्या लोकांना एअरलिफ्ट करण्याऐवजी हे विमान इराणमध्ये नेण्यात आले. आम्ही तीन वेळा एअरलिफ्ट करण्याचे प्रयत्न केले. मात्र, ते अपयशी ठरले. कारण, आमचे लोक विमानतळापर्यंत पोहोचू शकले नाहीत.

परराष्ट्र मंत्र्यांच्या माहितीनुसार ज्या लोकांनी विमानाचे अपहरण केले आहे, त्या सर्वांजवळ हत्यारे होते. मात्र, विमानाचे काय झाले, विमान आणण्यासाठी काय प्रयत्न केले जाणार आहे, याची माहिती त्यांनी दिली नाही. परराष्ट्र मंत्री दिमित्री कुलेबा यांच्या अध्यक्षतेखाली पूर्ण राजनैतिक सेवा कार्यरत आहे.

रविवारी 31 युक्रेनियनसहित 83 लोकांना सैन्यदलाच्या विमानाने अफगाणिस्तानवरून कीव या युक्रेनच्या राजधानीत नेण्यात आले. राष्ट्रपती कार्यालयाच्या माहितीनुसार 12 युक्रेनी सैन्य कर्मचारी मायदेशी परतले आहेत. तसेच विदेशी पत्रकार आणि सार्वजनिक क्षेत्रात काम करणार्‍या आणि मदतीची मागणी करणार्‍या लोकांची सुटका करण्यात आली आहे. अफगाणिस्तानमधील अजून 100 युक्रेनियन नागरिकांना एअरलिफ्ट होण्याची आशा आहे.

तालिबानी सत्तेनंतर आता नागरिकांमध्ये दहशतीचे वातावरण आहे. तालिबानच्या राजवटीत नरकयातना भोगव्या लागतील, या भीतीने अनेक नागरिक देश सोडून पलायन करत आहेत. अशातच देश सोडून जाणार्‍या नागरिकांची विमानतळावर गर्दी वाढत आहे. त्यामुळे विमानतळावर गोंधळाचे वातावरण निर्माण झाले आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने तणावपूर्ण स्थिती आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!