तालिबान-अफगाणिस्तान संघर्ष : आज 146 नागरिकांना भारतात सुरक्षित आणलं

नवी दिल्ली,

अफगाणिस्तानात अनेक भारतीय नागरिक अडकले आहेत. आज सकाळी दोहा येथून 146 जणांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले. तर आतापर्यंत भारतीय हवाई दलाने काबूलमधून जवळपास 400 नागरिकांना भारतात आणलं आहे. यात 329 जण भारतीय नागरिक आहेत. तर इतर अफगाणिस्तानातील शिख आणि हिंदू नागरिक आहेत.

रविवारी 168 जणांना घेऊन भारतीय हवाई दलाचे विमान मायदेशी परतले होते. तालिबानच्या तावडीतून बाहेर आल्यावर नागरिक सुटकेचा नि:श्वास सोडत आहेत. पण डोळ्यात भीतीही आहे. भारतीय मायदेशात आल्याने आनंदी आहेत. भारतात आल्यानंतर अफगाणिस्तानचे खासदार नरिंदरसिंग खालसा यांना आपल्या भावना व्यक्त केल्या. गेल्या 20 वर्षात जे काही कमावलं. ते आता संपले आहे, अशी हतबलता त्यांनी व्यक्त केली.

तालिबान्यांनी सत्ता हाती घेतल्यानंतर अफगाणिस्तानमधील परिस्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. सर्व देश आपल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्यात व्यस्त आहेत. अफगाणिस्तानचे अध्यक्ष अशरफ गनी यांनी देश सोडल्यानंतर तालिबानने रविवारी काबूलवर कब्जा केला. तेव्हापासून तेथे अराजकतेचे वातावरण आहे. अफगाणिस्तान-तालिबान या संकटाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी 17 ऑॅगस्ट रोजी सुरक्षाविषयक मंत्रिमंडळ समितीची बैठक घेतली. यानंतर, काबूलमधून भारतीयांना मायदेशी आणण्यात येत आहे.

अफगाणिस्तानमधील नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने अफगाणिस्तान सोडण्याचा प्रयत्न करत आहेत. देश सोडून जाण्यासाठी काबूल विमानतळावर नागरिकांनी मोठी गर्दी केल्याचे चित्र आहे. काबूल आंतरराष्ट्रीय विमानतळाबाहेर लोकांची गर्दी झाल्याने तणावपूर्ण स्थिती आहे. अशातच गोंधळ झाला आणि चेंगराचेंगरी झाली. या चेंगराचेंगरीत 7 अफगाण नागरिकांचा मृत्यू झाला आहे. याबाबतची माहिती बि-टीश लष्कराने दिली आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!