स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून पंचायती राज मंत्रालय ‘2030 पर्यंत शून्य उपासमार’ या विषयावर राष्ट्रीय वेबिनार आयोजित करणार
केंद्रीय मंत्री गिरीराज सिंह 23 ऑगस्ट रोजी वेबिनारचे उद्घाटन करणार
दिवसभर चालणाऱ्या वेबिनारमधून उपासमारीविरोधातील लढ्यात भारताच्या स्थितीबद्दल तळागाळातील नेत्यांमध्ये जागरूकता निर्माण होण्याची अपेक्षा
वर्ल्ड फूड कार्यक्रम, यूएनडीपीचे प्रतिनिधी आणि राज्यांचे पंचायत राज मंत्र्यांची असणार वेबिनारला उपस्थिती
नवी दिल्ली 21 AUG 2021
स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा भाग म्हणून, पंचायती राज मंत्रालय 23 ऑगस्ट रोजी ‘शाश्वत विकास उद्दिष्टांचे स्थानिकीकरण आणि पंचायतींची भूमिका – लक्ष्य क्रमांक 2 – शून्य उपासमार’ या राष्ट्रीय वेबिनारचे आयोजन करत आहे. पंचायती राज मंत्री गिरीराज सिंह यांच्या हस्ते या वेबिनारचे उद्घाटन होईल आणि पंचायती राज राज्य मंत्री कपिल मोरेश्वर पाटील हे देखील उपस्थित राहतील.
दिवसभर चालणाऱ्या या वेबिनारद्वारे तळागाळाच्या नेत्यांना उपासमारीच्या लढ्यातील भारताच्या स्थितीबद्दल जागरूक करणे अपेक्षित आहे तसेच त्यांना शून्य उपासमारीचे उद्दीष्ट साध्य करण्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारांच्या विविध योजना, कार्यक्रम, उपक्रम, निर्णय, नाविन्यपूर्ण उपाय इत्यादींची माहिती मिळेल. जी त्यांची क्षमता वाढवण्यास मदत करेल आणि त्यांना 2030 पर्यंत उपासमारमुक्त पंचायत आणि त्याद्वारे उपासमारमुक्त भारत सुनिश्चित करण्यासाठी स्थानिक पातळीवर कृती करण्यास सक्षम बनवेल.
23 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वाजता सुरू होणाऱ्या, वेबिनारमध्ये चार तांत्रिक सत्रे असतील, ज्यात अन्न उत्पादन आणि अन्न सुरक्षा, शाश्वत कृषी उत्पादन, सार्वजनिक वितरण, अन्न उत्पादन आणि प्रक्रियेतील नुकसान कमी करणे, पोषण सुरक्षा आणि 2030 पर्यंत शून्य उपासमारीसाठी तांत्रिक उपायांचा लाभ घेण्याबरोबरच उपासमारीशी लढा देण्याबाबत भारताची भूमिका यासारख्या महत्वाच्या समस्या/विषयांवर चर्चा होईल.