पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे उद्घाटन आणि पायाभरणी
भारताचे प्राचीन वैभव पुनरुज्जीवित करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती दर्शवलेल्या सरदार पटेल यांना केले नमन
विश्वनाथ ते सोमनाथ अशा विविध मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे केले स्मरण
धार्मिक पर्यटनात नव्या शक्यतांचा शोध घेत तीर्थयात्रा आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांची सांगड अधिक दृढ करणे ही प्रत्येक काळाची गरज- पंतप्रधान
दहशतीच्या पायावर साम्राज्य उभे करण्याचा विचार करणाऱ्या विघातक शक्ती कदाचित क्षणिक वरचढ ठरू शकतील मात्र त्यांचे अस्तित्व कदापि कायमस्वरूपी नाही, या शक्ती मानवतेला दीर्घ काळ दडपू शकत नाहीत. हे सत्य, काही हल्लेखोर सोमनाथ उध्वस्त करत असतानाही होते आणि आजच्या काळातही अशा मानसिकतेची जगाला धास्ती असतानाही तितकेच सत्य आहे- पंतप्रधान
कठीण समस्यांवर सलोख्याने तोडगा काढण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु. राम मंदिराच्या रूपाने आधुनिक भारताच्या वैभवाचा झळाळता स्तंभ येत आहे- पंतप्रधान
आमच्यासाठी इतिहासाचे सार आणि सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हा मूलमंत्र – पंतप्रधान
नवी दिल्ली, 20 ऑगस्ट 2021
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज गुजरातमधल्या सोमनाथ इथे विविध प्रकल्पांचे दूरदृश्य प्रणालीद्वारे उद्घाटन आणि पायाभरणी केली. सोमनाथ प्रोमनेड, सोमनाथ प्रदर्शन केंद्र आणि पुनर्बांधणी केलेल्या जुन्या सोमनाथ मंदिर परिसराचा उद्घाटन करण्यात आलेल्या प्रकल्पांमध्ये समावेश आहे. पंतप्रधानांनी यावेळी श्री पार्वती मंदिराची पायाभरणीही केली. लाल कृष्ण अडवाणी, केंद्रीय गृह मंत्री, केंद्रीय पर्यटन मंत्री यांच्यासह गुजरातचे मुख्यमंत्री आणि उपमुख्य मंत्रीही या कार्यक्रमाला उपस्थित होते.
जगभरातल्या भाविकांचे अभिनंदन करतानाच भारताचे प्राचीन वैभव पुनरुज्जीवित करण्यासाठी दुर्दम्य इच्छाशक्ती दर्शवलेल्या सरदार पटेल यांना पंतप्रधानांनी आदरांजली अर्पण केली. सरदार पटेल यांनी सोमनाथ मंदिराची, स्वतंत्र भारताच्या मुक्त भावनेशी सांगड घातली. स्वातंत्र्याच्या 75 व्या वर्षात, सरदार साहेबांचे प्रयत्न आपण पुढे नेत, सोमनाथ मंदिराला नवे वैभव प्राप्त करून देत आहोत हे आपले भाग्य असल्याचे पंतप्रधान म्हणाले. विश्वनाथ ते सोमनाथ अशा विविध मंदिरांचा जीर्णोद्धार करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर यांचे स्मरणही त्यांनी केले. आधुनिकता आणि परंपरा यांचा संगम असलेल्या त्यांच्या जीवनातून प्रेरणा घेत देश पुढे वाटचाल करत असल्याचे पंतप्रधान म्हणाले.
आधुनिकतेची पर्यटनाशी सांगड हे स्टच्यू ऑफ यूनिटी आणि कच्छचे परिवर्तन यासारख्या उपक्रमातून गुजरातने जवळून अनुभवले आहे. धार्मिक पर्यटनात नव्या शक्यतांचा शोध घेत तीर्थयात्रा आणि स्थानिक अर्थव्यवस्था यांची सांगड अधिक दृढ करणे ही प्रत्येक काळाची गरज आहे याकडे त्यांनी लक्ष वेधले. विनाशातून विकास आणि संहारातून सृजनाची निर्मिती भगवान शंकर करतात. शिव अनंत आहे, व्यक्त करता येणार नाही असा आहे, शाश्वत आहे. भगवान शिवावरची आपली श्रद्धा आपल्याला काळाच्या मर्यादेपलिकडे आपल्या अस्तित्वाची जाणीव करून देते त्याच बरोबर काळाची आव्हाने पेलण्यासाठी आपल्याला सामर्थ्यही देते असे पंतप्रधान म्हणाले.
श्रद्धास्थान असलेल्या मंदिरांच्या इतिहासावर नजर टाकताना मंदिरांचा वारंवार विध्वंस आणि प्रत्येक विध्वंसानंतर मंदिर जोमाने उभे राहिल्याचे स्मरण त्यांनी केले, सत्याचा पराभव करता येऊ शकत नाही आणि दहशतीच्या बळावर श्रद्धा चिरडता येत नाही याचे हे प्रतिक असल्याचे त्यांनी सांगितले.
दहशतवादाच्या पायावर जम बसवू पाहण्याचा विचार करणाऱ्या विघातक शक्ती कदाचित क्षणिक वरचढ ठरू शकतील मात्र त्यांचे अस्तित्व कदापि कायमस्वरूपी नाही, या शक्ती मानवतेला दीर्घ काळ दडपू शकत नाहीत. हे सत्य, काही हल्लेखोर सोमनाथ उध्वस्त करत असतानाही होते आणि आजच्या काळात अशा मानसिकतेची जगाला धास्ती असतानाही तितकेच सत्य आहे असे पंतप्रधान म्हणाले.
सोमनाथ मंदिराची पुनर्बांधणी ते नुतनीकरण हे शतकापासूनची इच्छाशक्ती आणि वैचारिक अखंडतेमुळे शक्य झाले. राजेंद्र प्रसाद जी, सरदार पटेल आणि के एम मुन्शी यांच्यासारख्या महान व्यक्तींना स्वातंत्र्यानंतरही या अभियानासाठी आव्हानांना तोंड द्यावे लागले. अखेर 1950 मध्ये आधुनिक भारताचा दिव्य स्तंभ म्हणून सोमनाथ मंदिर उभारले गेले. कठीण समस्यांवर सलोख्याने तोडगा काढण्याच्या दिशेने देशाची वाटचाल सुरु असून राम मंदिराच्या रूपाने आधुनिक भारताच्या वैभवाचा झळाळता स्तंभ येत आहे असे पंतप्रधान म्हणाले.
आपली वर्तमान स्थिती सुधारण्यासाठी आणि नवीन भविष्य घडवण्यासाठी इतिहासातून शिकण्याची आपली विचारसरणी असायला हवी असे ते म्हणाले. आपल्या ‘भारत जोडो आंदोलन’ या मंत्राचा उल्लेख करून मोदी म्हणाले की, ही केवळ भौगोलिक जोडणी नाही तर विचारांना जोडणारी देखील आहे. ‘ही प्रतिज्ञा भविष्यातील भारताची निर्मिती आपल्या भूतकाळाशी जोडण्यासाठी देखील आहे’, असे पंतप्रधान म्हणाले. “आपल्यासाठी इतिहास आणि विश्वासाचे सार म्हणजे सबका साथ, सबका विकास, सबका विश्वास आणि सबका प्रयास हे आहे”, असे पंतप्रधान म्हणाले. पंतप्रधानांनी भारताची एकता अधोरेखित करण्यासाठी विश्वास आणि विचार प्रणालीची भूमिका मांडली. ते म्हणाले, ‘पश्चिमेकडील सोमनाथ आणि नागेश्वरपासून पूर्वेकडे वैद्यनाथ पर्यंत, उत्तरेत बाबा केदारनाथपासून भारताचे दक्षिणेकडील टोक श्री रामेश्वरपर्यंत, ही 12 ज्योतिर्लिंग संपूर्ण भारताला जोडण्याचे काम करतात. त्याचप्रमाणे, आपली चारधामची व्यवस्था, आपल्या शक्तीपीठांची संकल्पना, आपल्या देशाच्या वेगवेगळ्या कोपऱ्यात वेगवेगळ्या तीर्थक्षेत्रांची स्थापना, आपल्या श्रद्धेची ही रूपरेषा प्रत्यक्षात ‘एक भारत, श्रेष्ठ भारत’ च्या भावनेची अभिव्यक्तीच आहे.
राष्ट्राचे ऐक्य बळकट करण्यासाठी अध्यात्माच्या भूमिकेबाबत बोलताना पंतप्रधानांनी पर्यटन आणि आध्यात्मिक पर्यटनाच्या राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय क्षमतेकडे लक्ष वेधले. आधुनिक पायाभूत सुविधा निर्माण करून देश प्राचीन वैभवाचे पुनरुज्जीवन करत असल्याचे ते म्हणाले. त्यांनी रामायण कालिन महत्व असलेल्या स्थळांना जोडणारे रामायण मंडल उदाहरण दिले जे रामभक्तांना भगवान रामशी संबंधित नवीन ठिकाणांबद्दल अवगत करत आहे आणि त्यांना जाणवून देत आहे की प्रभू राम हे संपूर्ण भारताचे राम कसे आहेत. त्याचप्रमाणे बुद्ध कालिन महत्व असलेल्या स्थळांना जोडणारे बुद्ध मंडल जगभरातील भाविकांना सुविधा पुरवत आहे. पर्यटन मंत्रालय स्वदेश दर्शन योजनेअंतर्गत 15 संकल्पनांवर पर्यटक सर्किट विकसित करत आहे, उपेक्षित भागात पर्यटनाच्या संधी निर्माण करत आहे अशी माहिती पंतप्रधानांनी दिली. केदारनाथ सारख्या डोंगराळ भागातील विकास, चार धामांसाठी बोगदा आणि महामार्ग, वैष्णोदेवी येथील विकास कार्य, ईशान्येकडील उच्च-तंत्र पायाभूत सुविधा हे अंतर कमी करत आहेत. त्याचप्रमाणे, 2014 मध्ये जाहीर झालेल्या प्रसाद योजनेअंतर्गत 40 प्रमुख तीर्थक्षेत्रे विकसित केली जात आहेत, त्यापैकी 15 आधीच पूर्ण झाली आहेत. गुजरातमध्ये 100 कोटींहून अधिक किमतीच्या तीन प्रकल्पांचे काम सुरू आहे. तीर्थक्षेत्रांना जोडण्याकडे लक्ष दिले जात आहे. पंतप्रधान म्हणाले की, देश पर्यटनाद्वारे केवळ सामान्य नागरिकांना जोडत नाही तर पुढेही जात आहे. 2013 मधील प्रवास आणि पर्यटन स्पर्धात्मकता निर्देशांकातल्या 65 व्या स्थानावरून देशाने 2019 मध्ये 34 व्या स्थानावर झेप घेतली आहे.
प्रशाद (तीर्थयात्रा कायाकल्प आणि आध्यात्मिक, वारसा वृद्धी मोहीम) योजनेअंतर्गत सोमनाथ परिसराचा 47 कोटींपेक्षा जास्त खर्च करून विकसित करण्यात आला आहे. ‘पर्यटक सुविधा केंद्र’ च्या आवारात विकसित झालेले सोमनाथ प्रदर्शन केंद्र, जुन्या सोमनाथ मंदिराचा उध्वस्त भाग आणि जुन्या सोमनाथच्या नगर शैलीतील मंदिर वास्तूची शिल्पे या प्रदर्शनात मांडली आहेत.
जुने (जुना) सोमनाथचे पुनर्रचित मंदिर परिसर श्री सोमनाथ ट्रस्टने 3.5 कोटी रुपये खर्चून पूर्ण केले आहे. या मंदिराला अहिल्याबाई मंदिर असेही संबोधले जाते कारण ते इंदूरच्या राणी अहिल्याबाईंनी बांधले होते, जेव्हा त्यांना आढळले की जुने मंदिर भग्नावस्थेत होते. जुन्या मंदिराचा संपूर्ण परिसर यात्रेकरूंच्या सुरक्षिततेसाठी आणि वाढीव क्षमतेसह समग्रपणे पुनर्विकसित करण्यात आला आहे.
श्री पार्वती मंदिर एकूण 30 कोटी रुपये खर्चून बांधण्याचे प्रस्तावित आहे. यामध्ये सोमपुरा सलाट शैलीमध्ये मंदिराचे बांधकाम, गर्भगृह आणि नृत्य मंडप यांचा समावेश असेल.