भारत-पाकिस्तान संबंधांवर तालिबानची पहिल्यांदाच सावध प्रतिक्रिया
नवी दिल्ली,
अफगाणिस्तानमध्ये सुरु असणार्या दहशतीच्या वातावरणातच प्रत्येक क्षणाला थरकाप उडवणारी दृश्य सार्या जगासमोर येत आहेत. परिस्थिती प्रत्येक क्षणाला चिघळत जात असतानाच आता तालिबानचा प्रवक्ता जबीहुल्लाह मुजाहिद यानं भारतासोबतच्या नात्याबाबत मोठं वक्तव्य केलं आहे.
अफगाणिस्तानात तालिबाननं देशाचा ताबा घेण्यास पावलं उचलली असतानाच याचे देशावर काय परिणाम होणार यासंबंधीचे प्रश्न उपस्थित होऊ लागले. त्यातच खुदद् तालिबानकडूनच या मुद्द्यावर पहिली प्रतिक्रिया देण्यात आली आहे.
तालिबानच्या प्रवक्त्यानं भारतासोबत आम्ही चांगलं नातं प्रस्थापित करु इच्छितो असं म्हटलं आहे. शिवाय सर्व राजकीय नेतेमंडळी देशात सुरक्षित असून, त्यांना देश सोडून जाण्याची गरज नाही, असंही तो म्हणाला.
एकिकडे भारतासोबत चांगले नातेसंबंध प्रस्थापित करु पाहणार्या तालिबाननं भारत आणि पाकिस्तान संघर्षाबाबतही आपली भूमिका स्पष्ट केली आहे. भारत आणि पाकिस्तानमधील परिस्थितीवर आपण हस्तक्षेप करु इच्छित नाही, कारण हा त्या दोन्ही राष्ट्रांमधील मुद्दा आहे. सध्या कोणालाही देश सोडण्याची गरज नाही.