75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाने 75 प्रमुख रेल्वे स्थानकांवर खादी उत्पादनांच्या प्रदर्शन व विक्रीसाठी स्टॉल्स उभारले
नवी दिल्ली 16 AUG 2021
75 वा स्वातंत्र्यदिन साजरा करण्यासाठी खादी व ग्रामोद्योग आयोगाने ( KVIC) देशभरातील 75 प्रमुख रेल्वे स्थानकांवर खादी उत्पादनांच्या प्रदर्शन व विक्रीसाठी केंद्रे (स्टॉल्स) उभारली आहेत. ही केंद्रे पुढील वर्षभर म्हणजे 2022 सालच्या स्वातंत्र्यदिनापर्यंत सुरु राहतील. हा उपक्रम ‘आजादी का अमृतमहोत्सव’ सोहोळ्याचा एक भाग आहे. देशभरातील 75 रेल्वे स्थानकांवर या खादी विक्री केंद्राचे उदघाटन शनिवारी करण्यात आले. या प्रमुख स्थानकांमध्ये नवी दिल्ली , छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस मुंबई,नागपूर, जयपूर, अहमदाबाद , सुरत, अंबाला छावणी , ग्वाल्हेर, भोपाळ, पाटणा, आग्रा, लखनौ , हावडा, बंगळुरू, एर्नाकुलम आणि इतर स्थानकांचा समावेश आहे. या विक्री केंद्रांवर खादी व ग्रामोद्योगाचे कापड, तयार कपडे, खादी सौन्दर्यप्रसाधने, खाद्यपदार्थ, मध, मातीची भांडी, इत्यादी वस्तूंची विक्री करण्यात येईल. देशभरात मोठ्या संख्येने प्रवास करणाऱ्या रेल्वे प्रवाशांना या प्रदर्शन व विक्री केंद्रांवर स्थानिक कारागिरांनी बनवलेल्या वस्तू त्या त्या रेल्वे स्थानकांवरच विकत घेता येतील. त्यामुळे स्थानिक खादी कारागिरांना आपली वस्तूंच्या विक्रीसाठी मोठे व्यासपीठ उपलब्ध होईल.
खादी व ग्रामोद्योग आयोगाचे अध्यक्ष विनय कुमार सक्सेना यांनी या उपक्रमाचे स्वागत करताना म्हटले आहे, कि रेल्वे व KVIC च्या या संयुक्त प्रयत्नामुळे खादी कारागिरांचे सक्षमीकरण होईल. “ 75 रेल्वे स्थानकांवर सुरु झालेल्या या विक्री केंद्रांकडे मोठ्या प्रमाणात खरेदीदार आकर्षित होतील, त्यामुळे खादीच्या विस्तृत श्रेणीतील उत्पादनांना प्रसिद्धी मिळेल. यातून फक्त ‘स्वदेशी’ लाच नव्हे तर शासनाच्या ‘व्होकल फॉर लोकल’ उपक्रमालादेखील उठाव मिळेल.”