74 वर्षात प्रथमच श्रीनगर पोलीस प्रतिकात राष्ट्रध्वज सामील
नवी दिल्ली
भारताचा 75 वा स्वातंत्रदिवस साजरा होत असताना श्रीनगर पोलिसांनी 74 वर्षात प्रथमच त्यांच्या प्रतीकांमध्ये राष्ट्रध्वज सामील केला आहे. शहरभर पोलिसांनी लावलेल्या विविध पोस्टर मध्ये सुद्धा लाल चौकातील घंटाघराच्या शिखरावर तिरंगा फडकताना दिसत आहे. गेल्या दोन वर्षात कलम 370 हटविल्यानंतर जम्मू काश्मीर मध्ये बराच बदल झाल्याचे आता दिसून येऊ लागले आहे. या घडीला जागोजागी काश्मीर घाटी मध्ये तिरंगा फडकताना दिसत असून विविध होर्डिंग मध्ये तिरंग्याचा फोटो छापला गेल्याचे पाहायला मिळते आहे. राष्ट्रवाद आता काश्मीरच्या मुख्य प्रवाहधारेत विलीन झाला असून जनतेच्या भावनांत पोलीस विभाग सुद्धा सामील झाल्याचे दिसत आहे.
श्रीनगर पोलिसांनी टिवटर अकौंटवर बदल करून लाल चौकात असलेल्या ऐतिहासिक घंटा घर शिखरावर तिरंगा फडकत असल्याचा फोटो सामील केला आहे. जम्मू काश्मीर पोलीस विभाग, जिल्हा पोलीस विभागाने त्यांच्या लोगो मध्ये राष्ट्रध्वज सामील करून राज्य दहशतवाद आणि फुटीरतावादापासून मुक्त झाल्याचा संदेश दिला आहे.
5 ऑॅगस्ट 2019 पूर्वी काश्मीर मध्ये दहशतवादी आणि फुटीरतावादी यांच्या भीतीने कुणीच सार्वजनिक पातळीवर राष्ट्रध्वज लावण्यास तयार होत नव्हते. 15 ऑॅगस्ट व 26 जानेवारी ला फक्त सरकारी इमारतींवर तो ही आतल्या बाजूला तिरंगा लावला जात असे. याच्या उलट पाकिस्तानी झेंडे मात्र गल्ली बोळातून फडकत असत. आता मात्र तिरंगा रॅली निघत आहेत. लाल चौक घंटा घर हा 1990 पासून राष्ट्रवादी आणि दहशतवादी तसेच फुटीरतावाद्यांसाठी प्रतिष्ठेचा प्रश्न बनला होता. ज्याचा झेंडा, त्याचा दबदबा असा हा प्रकार होता. आता या घंटाघरावर तिरंगा डौलाने फडकत आहे.
श्रीनगर मधील हरी पर्वत किल्ल्यावर सुद्धा 15 ऑॅगस्टला 100 फुट उंच स्तंभावर 36 फुट लांब आणि 24 फुट रुंद तिरंगा फडकाविला जाणार आहे.