महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यान मालेत उद्या दोन व्याख्यान

सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे आणि प्रसिध्द साहित्यिक डॉ शरणकुमार लिंबाळे यांचे व्याख्यान

नवी दिल्ली, दि. १२ : महाराष्ट्र परिचय केंद्राच्यावतीने आयोजित महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला अंतिम टप्प्यात असून सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे आणि प्रसिध्द साहित्यिक डॉ. शरणकुमार लिंबाळे हे शुक्रवार, १३ ऑगस्ट २०२१ रोजी अनुक्रमे ‘सेनानी साने गुरुजी’ व ‘आधुनिक महाराष्ट्रातील मराठी वाड्मयाची ओळख’  या विषयांवर ५७वे  आणि ५८वे पुष्प गुंफणार आहेत.

महाराष्ट्र राज्य निर्मितीला पूर्ण झालेले ६० वर्ष आणि महाराष्ट्र परिचय केंद्राच्या स्थापनेच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्ताने १९ मार्च २०२१ पासून ‘महाराष्ट्र हीरक महोत्सव व्याख्यानमाला’ सुरु असून ही व्याख्यानमाला अंतिम टप्प्यात आहे. व्याख्यानमालेत १३ ऑगस्ट रोजी सुभाष वारे हे सकाळी ११ वाजता तर   डॉ. शरणकुमार लिंबाळे हे दुपारी ४ वाजता आपले विचार मांडणार आहेत.

डॉ शरणकुमार लिंबाळे यांच्या विषयी

 डॉ. शरणकुमार लिंबाळे यांना देशातील प्रतिष्ठित व सर्वोच्च साहित्यिक पुरस्कारांपैकी एक असलेला सरस्वती सन्मान जाहीर झाला आहे.

डॉ लिंबाळे यांची ४२ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. १९८२ मध्ये प्रकाशित झालेला ‘उत्पात’ हा त्यांचा पहिला काव्यसंग्रह होय. १९८४ मध्ये प्रकाशित त्यांच्या ‘अक्करमाशी’ या आत्मचरित्राने प्रस्थापित मराठी विश्वाला जबरदस्त हादरे देत डॉ.लिंबाळे यांना स्वतंत्र ओळख दिली. त्यांच्या साहित्यकृतींवर एकूण ५४ अनुवादीत पुस्तके प्रकाशित  आहेत. डॉ. लिंबाळे यांच्या लिखाणावर विश्लेषण करणारे एकूण ११ पुस्तके प्रकाशित झाली असून ८ पिएचडी, १० एमफील प्रबंध झाले आहेत. साहित्यव्यवहारात कार्यरत देश -विदेशातील नामांकीत संस्थांवर त्यांनी विविध महत्वाच्या पदांवर कार्य केले आहे. १९८६ ते १९९२ या कालावधीत ते सोलापूरच्या आकाशवाणी केंद्रावर उद्घोषक म्हणून कार्यरत होते. यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापीठाच्या मानवीकी व समाज विज्ञान विभागाचे प्राध्यापक व संचालक म्हणून ते सेवानिवृत्‍त झाले.

‘अक्कारमाशी’ या आत्मचरित्रासह ‘झुंड’ आणि ‘हिंदू’  या त्यांच्या कादंबऱ्यांना महाराष्ट्र शासनाचे पुरस्कार प्राप्त झाले आहेत.

 सुभाष वारे यांच्या विषयी

श्री सुभाष वारे हे सामाजिक कृतज्ञता निधी ट्रस्टचे कार्यवाह म्हणून कार्यरत आहेत. संविधान साक्षरता हा त्यांचा जिव्हाळयाचा विषय असून त्यांनी ‘संविधान साक्षरता’अभियानांतर्गत विविध शिबीरांचे आयोजन केले आहे व ‘आपले भविष्य भारतीय संविधान’ हे त्यांचे पुस्तकही प्रकाशित आहे.

छात्रभारती विद्यार्थी संघटनेचे अध्यक्षपद भूषविणारे श्री. वारे हे शेतकरी,शेतमजूर आणि असंघटीत कष्टकरी यांच्या चळवळींशी जुडून आहेत.  राष्ट्र सेवादलाचे अध्यक्ष म्हणून त्यांनी जबाबदारी सांभाळली आहे. या संघटनेच्या माध्यमातून देशभरात आयोजित विविध शिबीरांद्वारे त्यांनी अनेक तरूण तरुणींना समाजकार्यात सक्रीय होण्याची प्रेरणा दिली.

भीमाशंकर परिसरातील आदिवासी भागात कार्यरत आदिवासी विकास प्रकल्पाचे समन्वयक  व भूमिअधिकार समितीचे सचिव म्हणूनही त्यांनी कार्य केले आहे.

शुक्रवारी समाज माध्यमांहून व्याख्यान प्रसारण  

शुक्रवार,  १३ ऑगस्ट 2021 रोजी  सकाळी  11  वाजता आणि दुपारी  4  वाजता  परिचय केंद्राच्या अधिकृत ट्विटरहँडल , फेसबुक  आणि युटयूब चॅनेलहून व्याख्यान थेट प्रसारित होणार आहे. जास्तीत-जास्त लोकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात येत  आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!