पद्म पुरस्कार- 2022 साठी नामांकने पाठवण्याची मुदत 15 सप्टेंबर 2021 पर्यंत खुली
नवी दिल्ली 09 AUG 2021
पद्म पुरस्कार (पद्म विभूषण, पद्म भूषण आणि पद्मश्री) 2022 यंदाच्या गणराज्य दिनानिमित्त जाहीर केले जातील. या पुरस्कारांसाठी नामांकने/शिफारशी पाठवण्याची अंतिम मुदत 15 सप्टेंबर 2021 ही आहे. यासाठीची नामांकने/शिफारसी केवळ ऑनलाईन स्वरूपातच पाठवता येणार असून, ती पद्म पुरस्कार पोर्टल https://padmaawards.gov.in वर पाठवता येतील.
पद्म पुरस्कारांचे स्वरूप ‘लोकांचे पद्म’ असे करण्यास सरकार कटिबद्ध आहे. त्यामुळेच, सर्वसामान्य लोकांचे कर्तृत्व आणि गुणवत्ता तसेच, त्यांनी केलेले उत्कृष्ट कार्य लक्षात घेऊन जे खरोखरच अशा पुरस्कारांसाठी पात्र आहेत, असे मान्यवर, विशेषतः अशा महिला, अनुसूचित जाती/जमातीचे लोक, दिव्यांग व्यक्ति जे समाजासाठी निस्वार्थी सेवा करत आहेत, त्यांची नावे नामांकने आणि शिफारसी म्हणून पाठवण्याचे आवाहन सरकारने केले आहे.
या नामांकने/शिफारसीमध्ये, पद्म पोर्टलवर दिलेल्या अर्जाच्या विहित नमुन्यात संपूर्ण सविस्तर माहिती भरुन पाठवायची आहे. त्याशिवाय, संबंधित व्यक्तिच्या कार्याविषयीची माहिती (जास्तीत जास्त 800 शब्दांत) भरुन पाठवायची आहे. या माहितीत, त्या व्यक्तीची, सबंधित क्षेत्र/शाखेतील कामगिरी आणि उल्लेखनीय सेवा कार्य यांचा स्पष्ट आणि सविस्तर उल्लेख असावा.
या संदर्भातील सविस्तर माहिती, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या संकेतस्थळावर (www.mha.gov.in) ‘पुरस्कार आणि पदके (‘Awards and Medals’) शीर्षकाखाली उपलब्ध आहे. या पुरस्कारांची सद्यस्थिती आणि नियमावली, देखील https://padmaawards.gov.in/AboutAwards.aspx या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अधिक माहिती/ मदतीसाठी कृपया संपर्क करा- 011-23092421, +91 9971376539, +91 9968276366, +91 9711662129, +91 7827785786