अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेमध्ये जगातील पहिली बायो बँक ऑफ आयुर्वेद स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी सहाय्याचे आयुष मंत्र्यांचे आश्वासन

नवी दिल्ली, 8 ऑगस्ट 2021

केंद्रीय आयुष मंत्री श्री सर्बानंद सोनोवाल आणि आयुष राज्यमंत्री डॉ. मुंजापारा महेंद्रभाई यांनी रविवारी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेला भेट दिली आणि तेथील बहुउद्देशीय योग सभागृह आणि मिनी प्रेक्षागाराचे उदघाटन केले. दोन्ही मंत्र्यांनी अखिल भारतीय आयुर्वेद संस्थेने (AIIA) केलेल्या कार्याची प्रशंसा केली आणि संस्थेला जगातील सर्वोत्तम आयुर्वेद संस्था बनवण्याच्या  तिच्या  पुढील विकासासाठी पूर्ण सहाय्य  करण्याचे आश्वासन दिले. संस्थेच्या भविष्यातील योजनेचे कौतुक करताना, श्री सर्बानंद सोनोवाल यांनी एआयआयए येथे आयुर्वेदाची  जगातील पहिली बायो-बँक स्थापन करण्यासाठी सर्वतोपरी मदत करण्याचे आश्वासन दिले.

दोन्ही मंत्र्यांना एआयआयए येथे असलेल्या विविध सुविधा दाखवण्यात आल्या आणि त्यांनी संस्थेतील वैशिष्ट्यपूर्ण कार्याची माहिती  जाणून घेण्याची  उत्सुकता दाखवली. श्री सर्बानंद यांनी एआयआयएचे संचालक प्रा.डॉ.तनुजा नेसारी यांना त्यांच्या  संशोधनावर अधिकाधिक भर देण्यासह  ते लोकांपर्यंत स्थानिक भाषांमधून  पोहोचवायला हवे ,अशी अपेक्षा व्यक्त केली.

एआयआयएमधील सर्वंकष उपचारांच्या दृष्टिकोनाचे कौतुक करताना, राज्यमंत्री डॉ. मुंजापारा महेंद्रभाई यांनी त्यांना एकात्मिक आणि समग्र उपचारांवर लक्ष केंद्रित करण्याचा सल्ला दिला.

दोन्ही मंत्र्यांनी  संस्था, कोविड आरोग्य केंद्र आणि कोविड चाचणी केंद्राच्या उपक्रमांबाबत समाधान व्यक्त केले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!