देशात गेल्या 24 तासांत 40 हजारांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, 50 टक्के रुग्ण फक्त केरळमधील
नवी दिल्ली प्रतिनिधी
4 ऑॅगस्ट
देशात कोरोनाबाधितांच्या संख्येत पुन्हा काहीशी वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे. बुधवारी आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 42,625 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 562 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला आहेय केरळमध्ये काल सर्वाधिक 23,676 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. दरम्यान, देशभरात गेल्या 24 तासांत 36,668 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.
केरळमध्ये कोरोनाच्या नव्या रुग्णांमध्ये वाढ झाली आहे. गेल्या 24 तासांत 23,676 रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर कोरोनाबाधितांची संख्या वाढून 34.49 लाख झाली आहे. केरळमध्ये सलग सहाव्या दिवशी 20 हजारांहून अधिक रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
कोरोनाच्या प्रादुर्भावाला सुरुवात झाल्यापासून आतापर्यंत एकूण तीन कोटी 17 लाख 69 हजार रुग्णांना कोरोनाची लागण झाली आहे. यापैकी 4 लाख 25 हजार 757 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. महत्त्वाची गोष्ट म्हणजे, 3 कोटी 9 लाख 33 हजार रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. देशातील सक्रिय रुग्णांची संख्या अजूनही चार लाखांहून अधिक आहे. एकूण 4 लाख 10 हजार 353 रुग्णांवर उपचार सुरु आहेत.
राज्यात काल (मंगळवार) 6005 नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 6 हजार 799 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहे. राज्यात आतापर्यंत 61 लाख 10 हजार 124 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.66 टक्के झाले आहे.
राज्यात काल (मंगळवार) कोरोनामुळे 177 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.1 टक्के झाला आहे. तब्बल 31 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल (मंगळवार) एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 74 हजार 318 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. एकूण सहा जिल्ह्यांमध्ये अॅक्टिव्ह रुग्ण 100 च्या खाली आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (64), अमरावती (87) वाशिम (77), गोंदिया (96), गडचिरोली (22) या सहा जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 552 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
नंदूरबार, हिंगोली, यवतमाळ, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर या जिल्ह्यांमध्ये काल (मंगळवार) शून्य रुग्ण आढळले आहेत. आजपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,85,32,523 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,21,068 (13.02 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,51,971 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,009 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईन मध्ये आहेत.
मुंबईत गेल्या 24 तासात 288 कोरोना बाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासात 412 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आतापर्यंत मुंबईत 7,12,723 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. सध्या मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के आहे. गेल्या 24 तासात मुंबई तीन रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. सध्या मुंबईत 4616 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर मुंबईत रुग्ण दुपटीच दर 1555 दिवसांवर गेला आहे.