पेगासस हेरगिरी प्रकरणावरुन विरोधी पक्ष आक्रमक; मोदी म्हणाले – विरोधक संसद चालवू देत नाही हा लोकशाही व जनतेचा अपमान
नवी दिल्ली प्रतिनिधी
3 ऑगस्ट
पेगासस हेरगिरी प्रकरणावरुन विरोधी पक्ष सरकारला घेराव घालत आहे. संसदेचे पावसाळी अधिवेशन सुरु होऊन 15 दिवस उलटले तरी गदारोळ मात्र कायम आहे. मंगळवारी राज्यसभेचे कामकाज सुरु होताच 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते. परंतु, पुन्हा कामकाज सुरु होताच ही परिस्थिती कायम असल्याने राज्यसभा दुसर्यांदा 2 वाजेपर्यंत तहकूब केली गेली. तर दुसरीकडे लोकसभेचे कामकाजदेखील 12 वाजेपर्यंत तहकूब करण्यात आले होते.
हा लोकशाही व जनतेचा अपमान – पंतप्रधान
पेगासस हेरगिरी प्रकरण, कृषी कायदा आणि महागाईच्या मुद्यांवरुन विरोधी पक्ष आक्रमक भूमिकेत आहे. यामुळे संसदेच्या दोन्ही सभागृहात गदारोळ सुरु असून कामकाज मात्र ठप्प झाले आहे. यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधक संसदेचे कामकाज चालवू देत नसून हा लोकशाही व जनतेचा अपमान असल्याचे म्हटले आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्या उपस्थितीत भाजप सदस्यांची बैठक घेतली. यामध्ये भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डादेखील उपस्थित होते.
यासाठी केंद्र सरकार जबाबदार – खरगे
संसदेच्या दोन्ही सभागृहातील ठप्प असलेल्या कामकाजासाठी केंद्र सरकार जबाबदार असल्याचे राज्यसभा विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटले आहे. सरकारला स्वत:चे पितळ उघडे करायचे नसल्याने चर्चा करायला नकार देत आहे असे खरगे यांनी यावेळी सांगितले.
लोकसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयक सादर
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी नुकतचे लोकसभेत न्यायाधिकरण सुधारणा विधेयक, 2021 सादर केले. हे विधेयक न्याय वितरण प्रणाली सुव्यवस्थित करण्याच्या उद्देशाने हे तयार केले गेले असल्याचे सांगितले आहे. तर दुसरीकडे, संविधान (अनुसूचित जमाती) आदेश (सुधारणा) विधेयक, 2021 आणि अंतर्देशीय जहाज विधेयक, 2021 यासह महत्त्वाच्या विधेयकांवर आज राज्यसभेत चर्चा होऊ शकते.
पी. व्ही. सिंधूचे दोन्ही सभागृहात अभिनदंन
टोकियो ऑॅलिम्पिकमध्ये भारतासाठी कांस्यपदक जिंकणार्या पी. व्ही. सिंधूचे संसदेच्या दोन्ही सभागृहात अभिनंदन करण्यात आले आहे. दरम्यान, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला म्हणाले की, पी. व्ही. सिंधूने ऑॅलिम्पिकमध्ये सलग दुसर्यांदा पदक पटकावले आहे. ती कोणत्याही वैयक्तिक स्पर्धेत दोन पदक जिंकणारी पहिली भारतीय महिला आहे. तर दुसरीकडे, राज्यसभेचे सभापती एम. व्यंकय्या नायडू यांनीदेखील पी. व्ही. सिंधूचे अभिनंदन केले आहे.