अनाथ मुलांच्या कल्याणासाठी कायद्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याचे उपराष्ट्रपतींचे आवाहन
”अनाथ मुलांसाठी माझ्या मनात हळवा कोपरा आहे”: उपराष्ट्रपती
केंद्रीय महिला आणि बालकल्याण मंत्री श्रीमती स्मृती इराणी यांनी अनाथ मुलांच्या कल्याणासाठीच्या विविध उपक्रमांची उपराष्ट्रपतींना दिली माहिती
नवी दिल्ली, 4 ऑगस्ट 2021
उपराष्ट्रपती श्री एम व्यंकय्या नायडू यांनी आज बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण) कायद्यातील अलीकडील सुधारणेचे स्वागत केले आणि या कायद्याच्या तळागाळापर्यंत प्रभावी अंमलबजावणीच्या गरजेवर त्यांनी भर दिला.
केंद्रीय महिला आणि बाल विकास मंत्री श्रीमती.स्मृती इराणी यांनी उप-राष्ट्रपती निवासात नायडू यांची भेट घेतली त्यावेळी ते बोलत होते. उपराष्ट्रपतींनी नमूद केले की, अनाथ मुलांच्या समस्यांसंदर्भात त्यांना अनेक निवेदने प्राप्त झाली आहेत.
राज्यसभेत अलीकडेच मंजूर झालेल्या बाल न्याय (मुलांची काळजी आणि संरक्षण (सुधारणा) विधेयक, 2021, मधील प्रमुख वैशिष्ट्यांविषयी त्यांना मंत्र्यांकडून माहिती देण्यात आली.
दत्तक प्रक्रियेला गती देण्यासाठी आणि अनाथ मुलांना अधिक संरक्षण सुनिश्चित करण्याच्या दृष्टीने, नुकत्याच झालेल्या या सुधारणांअंतर्गत जिल्हा दंडाधिकारी आणि अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यांना अधिकार प्रदान करण्यात आले आहे, यासंदर्भातील माहिती श्रीमती. इराणी यांनी उपराष्ट्रपतींना दिली.
अनाथांच्या कल्याणासाठी, साहाय्य आणि पुनर्वसन उपायोजनांसह केंद्राकडून राज्यांच्या भागीदारीने राबविण्यात येत असलेल्या विविध उपक्रमांचा मंत्र्यांनी यावेळी उल्लेख केला.
श्री नायडू म्हणाले की, त्यांच्या मनात अनाथ मुलांसाठी “हळवा कोपरा” आहे. अनाथांचे संरक्षण आणि कल्याण सुनिश्चित करणे ही समाज आणि सरकारची सामूहिक जबाबदारी आहे याचा पुनरुच्चार त्यांनी केला.
अलीकडेच, अनाथ मुलांच्या एका गटाने उप-राष्ट्रपती निवासात त्यांची भेट घेतली.