राष्ट्रपतींनी वेलिंग्टन येथील डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजच्या 77 व्या स्टाफ कोर्समधील विद्यार्थी अधिकाऱ्यांना संबोधित केले.

नवी दिल्‍ली, 4 ऑगस्‍ट 2021

राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी आज (04 ऑगस्ट 2021) तामिळनाडूमधील वेलिंग्टन येथील  डिफेन्स सर्विसेस स्टाफ कॉलेजमध्ये 77 व्या स्टाफ कोर्समधील विद्यार्थी अधिकाऱ्यांना संबोधित केले

या प्रसंगी बोलताना राष्ट्रपती म्हणाले की आपल्या देशाची सशस्त्र दले आपल्या महान राष्ट्राच्या सर्वात प्रतिष्ठित संस्थांपैकी एक आहेत. या दलांतील सेनानींचे अथक प्रयत्न आणि थोर त्यागांमुळे देशाच्या नागरिकांकडून त्यांनी मोठा मान कमविला आहे. युध्द तसेच शांतता काळात त्यांनी देशाची अनमोल सेवा केली आहे. संरक्षणाशी संबंधित देशांतर्गत आणि परकीय आव्हानांना तोंड देताना तसेच नैसर्गिक आपत्तींच्या काळात त्यांनी समर्पण वृत्तीने आणि धाडसाने त्यांची कर्तव्ये पार पाडली आहेत असे राष्ट्रपती म्हणाले.

गेला काही काळ संपूर्ण मानवजातीसाठी अत्यंत कठीण काळ होता. आपल्या देशाच्या सीमांवरील परिस्थिती आणि कोविड-19 महामारीमुळे देशात उद्भवलेली आपत्कालीन परिस्थिती या दोन्हींशी सामना करताना संरक्षण दलांतील पुरुष आणि स्त्रियांनी दाखविलेला अपरिमित कणखरपणा आणि निश्चयी वृत्ती  याविषयी कोविड-19 महामारीचा संदर्भ देत राष्ट्रपतीनी त्यांचे  कौतुक केले. या आव्हानांना तोंड देणारे बहुतांश जण आघाडीवरील योद्धे होते. देश त्यांची वचनबद्धता आणि योगदानाचे कौतुक करत आहे असे राष्ट्रपती म्हणाले.  

राष्ट्रपती म्हणाले की आपण सर्वजण सध्या सततच्या बदलांनी भरलेल्या आव्हानात्मक काळातून जात आहोत. राष्ट्रीय सुरक्षा आणि संरक्षणाच्या संकल्पना देखील बदलत आहेत. सक्तीचे भू-धोरणात्मक आणि भू-राजकीय  बदल आणि इतर अनेक घटकांनी सुरक्षाविषयक चित्र आणखीनच गुंतागुंतीचे केले आहे. स्टाफ कोर्सच्या काळात विद्यार्थी अधिकाऱ्यांना बदलत्या प्रेरकशक्ती समजून घेण्यासाठी मदत करणारी माहिती पुरविण्यात आली याकडे त्यांनी लक्ष वेधले.

राष्ट्रपतींनी सांगितले की 21 व्या शतकातील समाजाचे वर्णन माहितगार समाज असे केले जाते. जसे आपण माहितीच्या अर्थव्यवस्थेत आहोत असे म्हणतो तसेच आपण माहितीच्या संग्रामाच्या देखील काळात आहोत. संरक्षणविषयक व्यावसायिक म्हणून, या अधिकाऱ्यांनी माहितीविषयक योद्धे होणे अपेक्षित आहे. 

देशातील पुरुष आणि स्त्रियांचे प्रभावी नेते होण्यासाठी या अधिकाऱ्यांना व्यक्तिगत आणि व्यावसायिक क्षेत्रांमध्ये अव्वल दर्जाची कामगिरी करून दाखवावी लागेल. विश्वास, धैर्य, सहनशक्ती, एकात्मता,नम्रता आणि साधेपणा हे गुण त्यांना व्यक्ती म्हणून कणखर बनवतील. अत्याधुनिक तंत्रज्ञान, नवनवीन धोरणे आणि डावपेच आणि अलीकडच्या घडामोडी यांचे अविरत अध्ययन त्यांना उत्तम व्यावसायिक म्हणून आकार देईल असे राष्ट्रपती राम नाथ कोविंद यांनी सांगितले.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!