कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

चंद्रपूर प्रतिनिधी

कोरोनामुळे घरातील कर्ता व्यक्ती गमावलेल्या  कुटुंबांचे पालकमंत्र्यांकडून सांत्वन

चंद्रपूर दि. 20 जून: देशभरात कोरोनामुळे लाखो लोकांना आपला जीव गमवावा लागला. यात अनेकांनी आपले आप्तस्वकीय गमावले. घरातील कर्ता माणूसच कोरोनामुळे मृत्यू पावल्याने संपूर्ण कुटुंबावर उपासमारीची वेळ आली. ब्रम्हपुरी  तालुक्यातील कोरोनामुळे प्रमुख व्यक्ती गमावलेल्या कुटुंबातील सदस्यांची  पालकमंत्री विजय वडेट्टीवार यांनी  ब्रम्हपुरी  येथील विठ्ठल रुक्माई सभागृहात सांत्वनपर भेट घेऊन गरजू कुटूंबांना आर्थिक मदत केली.

कार्यक्रमाला जिल्हा परिषद सदस्य स्मिता पारधी, नगराध्यक्षा रिता उराडे, प्रमोद चिमुरकर, विलास निखार, ज्ञानेश्वर कायरकर, तहसीलदार विजय पवार प्रामुख्याने उपस्थित होते.

यावेळी पालकमं‌त्री म्हणाले की, दुर्दैवाने कोरोना आजाराने अनेकांचे मृत्यु झाले. यातच घरातील कर्ता व्यक्ती गमावल्याने कुटूंब उघड्यावर पडले, त्यांच्यावर उपासमारीची वेळ आली आहे. अशा वेळी मिळणारी मदत ही अपुरीच आहे. ब्रम्हपुरी तालुक्यातील जवळपास 175 मृत्यु कोरोनामुळे झाले आहे. सुरवातीच्या काळात तालुक्यात दहासुध्दा ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध नव्हते. मात्र शासन आणि प्रशासनाच्या पाठपुराव्यामुळे आजमितीला तालुक्यात 110 ऑक्सिजन सिलेंडर उपलब्ध आहेत. या महामारीच्या काळात आरोग्य व्यवस्था अपु-या पडल्या तरी प्रशासनाकडून शर्तीचे प्रयत्न झालेत. त्यामुळे नागरिकांनासुध्दा दिलासा मिळाला. कोरोनाचा धोका अजूनही संपला नसून नागरिकांनी येणाऱ्या तिस-या लाटे संदर्भात काळजी घ्यावी. तसेच उत्तम आरोग्य बाळगण्याच्या सूचना पालकमंत्र्यांनी उपस्थितांना दिल्या.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!