भारतीय तटरक्षक दलाच्या सार्थक जहाजाचे जलावतरण
गोवा,
सागरी सुरक्षेच्या दृष्टीने अतिशय महत्वाचे ठरणार्या आयसीजीएस सार्थक या भारतीय तटरक्षक दलाच्या जहाजाचे आज गोवा शिपयार्ड येथे जलावतरण करण्यात आले. भारतीय तटरक्षक दलाचे महासंचालक के. नटराजन, गोवा शिपयार्ड लिमिटेडचे व्यवस्थापकीय संचालक बी.बी.नागपाल यांची याप्रसंगी उपस्थिती होती. यशस्वीरित्या सर्व चाचण्या झाल्यानंतर ‘सार्थक’ आज भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात सामिल झाले.
देशातील व्यापारापैकी आकारमानाने 95म आणि 75म मुल्याचा व्यापार सागरीमार्गे होतो. देशाच्या जीडीपीत हे प्रमाण सुमारे 50म आहे. अशाप्रकारे किनारपट्टी क्षेत्र असलेली राज्ये आणि एकूण किनारपट्टी देशाचा आर्थिक विकास आणि राष्ट्रीय सुरक्षेशी थेट जोडली आहे. त्यामुळे तटरक्षक दलाने दक्षता बाळगून सागरी सुरक्षेसह व्यापारपूरक वातावरण निर्मितीला प्राधान्य दिले आहे, असे प्रतिपादन महासंचालक के. नटराजन यांनी केले.
तटरक्षक दलाने नैसर्गिक आपत्ती आणि आणीबाणीच्या प्रसंगांची माहिती देण्यासाठी बहुभाषांचा वापर सुरु केला आहे. यामुळे अनेकांचे प्राण वाचण्यास मदत झाली असल्याचे महासंचालकांनी याप्रसंगी सांगितले.
‘सार्थक’ हे पाच सागरी गस्ती जहाजांच्या मालिकेतील चौथे जहाज आहे. गोवा शिपयार्डने याची बांधणी केली आहे. बहुविध मोहिमांमध्ये कामगिरी करण्याची या जहाजाची क्षमता आहे. 105 मीटर लांबी असलेल्या जहाजाचे वजन 2450 टन असून 9100 किलोवॅट क्षमतेची दोन इंजिन आहे. आत्मनिर्भर भारत मोहिमेअंतर्गत जहाजाची संपूर्ण स्वदेशी तंत्रज्ञानाने निर्मिती करण्यात आली आहे, जी जागतिक उत्पादनांच्या बरोबरीची आहे.
अत्याधुनिक तंत्रज्ञानाने युक्त जहाजामध्ये सेन्सर्स आणि शस्त्रसामुग-ी आणि एकात्मिक मशिनरी नियंत्रण व्यवस्था आहे. यामुळे तटरक्षक दलाला शोध आणि बचावकार्यासाठी, सागरी गुन्हे हाणून पाडण्यासाठी चांगली मदत होणार आहे.
‘सार्थक’ जहाज, गुजरातेतील पोरबंदर येथे तैनात केले जाणार असून, देशाच्या पश्चिम किनारपट्टीवर गस्त घालण्यासाठी याचा वापर होईल. उपमहासंचालक एम.एम.सय्यद हे या जहाजाचे नेतृत्व करणार असून त्यांच्या मदतीला 11 अधिकारी आणि 110 खलाशांचा चमू असणार आहे.