औरंगाबादमधील प्राध्यापक हत्या प्रकरणाचं गूढ उकललं, आरोपी ताब्यात, कसं मारायचं याचा शोध गुगलवर घेतला!
औरंगाबाद,
प्राध्यापक राजन शिंदे यांच्या हत्या प्रकरणाचं गूढ अखेर उकललं आहे. पोलिसांनी या प्रकरणी एका आरोपीस ताब्यात घेतलं आहे, हा आरोपी अल्पवयीन असल्याची माहिती आहे. हा आरोपी राजन शिंदे यांचा निकटवर्ती असून त्यानं हत्येसाठी वापरलेले डंबेल्स, चाकू आणि रक्ताने माखलेला टॉवेल पोलिसांनी हस्तगत केला आहे. आरोपीने या वस्तू घरापासून शंभर मीटरवर असलेल्या एका विहिरीमध्ये टाकल्या होत्या.पोलिसांनी तब्बल तीन दिवस या विहिरीतलं पाणी उपसून ही हत्यारे जप्त केली आहेत. विशेष म्हणजे 9 महिन्यापासून मारेकरी शिंदे यांची हत्या करण्याचा प्लॅन करत होता. कोणत्या ठिकाणी मारल्यानं माणुस मरु शकतो याचा गुगलवर शोध घेतला.
प्रा. राजन शिंदे रविवारी रात्री साडेअकरा ते बारा वाजेच्या सुमारास घरी आले. तेव्हा निकटवर्तीय जागेच होते. कोणी टीव्ही पाहात होते. कोणी वेबसिरीज पाहात होते. शिंदे येताच त्यांनी अभ्यासावरून मुलांना टोकले. त्यातून त्यांचा वाद झाला. वादाला इतरही काही कारणे आहेत. मात्र, ते पोलिसांनी सांगण्यास नकार दिला. वाद वाढत गेला. तेव्हाच निकटवर्तीयाने आज काटा काढायचाच असे ठरविले. त्यानंतर पहाटे दोन ते चारच्या दरम्यान मारेकर्याने व्यायामाच्या डंबेल्सने डोक्यात वार केले. त्यातील एक वार कानाजवळ लागल्याने अर्धा कान तुटला. शिंदे निपचित पडल्यावर आधीपासूनच प्रचंड द्वेषात असलेल्या मारेकर्याने किचनमधून चाकू आणले आणि गळा चिरला.
औरंगाबाद शहरातील हाय प्रोफाईल सोसायटी असलेल्या एन 2 भागात प्राध्यापक राजन शिंदे यांच्या खून प्रकरणात आठवड्यानंतर उलगडा झाला आहे. राजन शिंदे यांच्या खून प्रकरणात पोलिसांनी कुटूबियांचीही 10 तास चौकशी केली. मात्र त्यातून ठोस काही हाती लागलं नव्हतं. शिंदे यांचा सोमवारी पहाटे राहत्या घरी खून झाला. त्यांच्या गळ्यावर तीक्ष्ण हत्यारानं वार करण्यात आले होते. तर त्यांच्या पोटावर बसून त्यांच्या हाताच्या नस कापण्यात आल्या होत्या. या निर्घूण खूनानंतर पोलिस आयुक्त स्वत: घटनास्थळी तब्बल 5 तास होते.
याआधीही शहरातील श्रुती भागवत खून प्रकरणाला 6 वर्ष लोटून गेले तरी पोलीस काहीही शोधण्यात असमर्थ ठरले आहेत.. श्रुती भागवत खून प्रकरणात ज्या अधिकार्यांनी तपास केला त्याच अधिकार्याकडे या प्रकरणाचाही तपास आहे. त्यामुळं हे ही प्रकरण न उलगडता बंद होते का? असाही प्रश्न उपस्थित केला जाऊ लागला होता.. एका प्राध्यापकाचा राहत्या घरात निघृर्ण खून होतो आणि इतके उलटूनही पोलिस यात काहीच करू शकत नाही, म्हणजे कायदा व्यवस्था अस्तित्वात आहे का? असाही सवाल नागरिक विचारु लागले होते.