बंधार्‍या लगतच्या खड्ड्यात बुडून 12 वर्षीय मुलाचा मृत्यू

ठाणे,

बंधार्‍या लगतच्या खड्ड्यातील पाण्यात बुडून 12 वर्षीय मुलाचा दुर्दैर्वी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. धक्कादायक बाब म्हणजे वाळू माफिया बंधार्‍यामधून वाळू उपसा करत आहे. त्यामुळे बंधार्‍या लगतच मोठ मोठे खड्डे तयार होऊन त्यामध्ये पाणी साचले जात आहे. याच पाण्यात बुडून मुलाचा मृत्यू झाल्याचा आरोप नातेवाइकांनी केला आहे. ही घटना शहापूर तालुक्यातील मोखवणे – राड्याचा पाडा येथील बंधार्‍यालगत घडली आहे. याप्रकरणी शहापूर पोलीस ठाण्यात अस्कमात मृत्यूची नोंद करून पोलिसांनी तपास सुरु केला आहे. रोहीत गुळवे (वय, 12) असे पाण्यात बुडून मृत्यू झालेल्या मुलाचे नाव आहे.

शहापूर तालुक्यातील कसारा गावातील विठ्ठलवाडी येथील मृतक रोहीत व त्याचे मित्र सायकल धूण्यासाठी रोज मोघवणे येथील राड्याचा पाडा बंधार्‍यावर जात होते. त्यातच काल (शनिवारी) नेहमीप्रमाणे बंधार्‍यावर गेले होते. त्यावेळी रोजच्या जागेवर सायकल उभी करून तो गेला. मात्र या ठिकाणाची वाळू माफीयानी बेकायदेशीर रित्या रेती उपसा केल्याने तेथे खड्डे तयार झाले आहेत. याच खड्ड्यातील पाण्यात रोहीतचा बुडून दुर्दैर्वी मृत्यू झाला. विशेष म्हणजे वाळू उपसा करण्यास बंदी आहे. तरीही शहापूर तालुक्यातील वाळू उपसा करणारी टोळी सक्रिय असून महसूल विभाग याकडे दुर्लक्ष करत असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांनी केला आहे.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!