काश्मीरमध्ये अज्ञात हल्लेखोरांचा बिहारी कामगारांवर गोळीबार, दोघांचा मृत्यू
श्रीनगर,
जम्मू काश्मीरमध्ये तीन बिहारी नागरिकांवर गोळीबार करण्यात आला असून त्यातील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. तिसर्या कामगारालाही गोळ्या लागल्या असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू करण्यात आले आहेत. कामानिमित्त काश्मीरमध्ये राहणार्या या नागरिकांवर अज्ञात इसमानं अंदाधुंद गोळीबार केला. या घटनेमुळे खळबळ उडाली असून जम्मू काश्मीर पोलिसांची हल्लेखोरांचा शोध सुरू केला आहे.
जम्मू काश्मीरच्या कुलगाम जिल्ह्यात लारन गांजीपोरा भागात तीन बिहारी कामगारांवर अचानक गोळीबार करण्यात आला आला. या गोळीबारात तिघांनाही गोळ्या लागल्या. त्यातील दोघांचा घटनास्थळीच मृत्यू झाला, तर एकजण गंभीर जखमी झाला. राजा रेशी देव, जोगींदर रेशी देव आणि चुनचुन रेशी देव अशी या तिघांची नावं आहेत. यापैकी चुन चुन रेशी देव या हल्ल्यात गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू करण्यात आले आहेत.
ही घटना समजताच सुरक्षा दलाच्या हालचालींनी वेग घेतला. तातडीनं घटनास्थळी पोहोचत जखमी कामगाराला हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं. हल्लेखोरोचा शोध सुरू करण्यात आला असून सर्व संशयित ठिकाणी भारतीय सैन्यानं धाडसत्र सुरू केलं आहे. लवकरच संशयिताला ताब्यात घेतलं जाईल, अशी माहिती जम्मू काश्मीर पोलिसांनी दिली आहे.
आतापर्यंत सैनिकांवर आणि पोलिसांवर हल्ले होत होते. मात्र आता सामान्य माणसावर हल्ले व्हायला सुरुवात झाल्याचं चित्र या घटनेच्या निमित्तानं दिसून आलं आहे. गेल्या काही महिन्यांपासून पाकिस्तानकडून ड्रोन पाठवून काश्मीरमध्ये घातपाती कारवाया करण्याचे डाव आखले जात होते. हे सर्व डाव भारतीय सैन्यानं हाणून पाडले. त्यानंतरही कुठल्या ना कुठल्या मार्गानं अशांतता निर्माण करण्याचा प्रयत्न केला जात असल्याचं चित्र आहे.
काश्मीरमधील कारवाया थांबल्या नाहीत, तर पुन्हा एकदा सर्जिकल स्ट्राईकसाठी तयार राहण्याचा इशारा केंद्रीय मंत्री अमित शाह यांनी दिला होता. त्यानंतर पाकिस्ताननं शांततेची भाषा सुरु केली होती. मात्र या हल्ल्याच्या निमित्तानं पाकिस्ताननं काश्मीरमध्ये उपद्रवी कारवाया सुरुच ठेवल्याचं सिद्ध होत आहे.