गरब्यात अहिंदूंना प्रवेश दिल्यानं गदारोळ: ‘लव्ह जिहाद’चा आरोप करत इंदूरमध्ये थांबवला गरबा; विहिंप, बजरंग दलाचे कार्यकर्ते आक्रमक
इंदूर,
देशात लव्ह जिहादच्या मुद्द्यावर नेहमीच बरीच चर्चा होताना दिसते. ‘लव्ह जिहाद’ या शब्दावरून अनेक ठिकाणी वादही सुरू आहेत. ‘लव्ह जिहाद’ला हिंदूत्ववादी संघटनांचा तीव- विरोध आहे. गेल्या काही वर्षांपासून या मुद्द्यावरून राजकीय वातावरण बरंच तापलं आहे. हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते यावरून नेहमी इशारा देत असतात. इंदूरमध्ये नवरात्री उत्सवात लव्ह जिहादचं कारण देत हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी हस्तक्षेप केला आहे.
इंदूरमध्ये एका गरब्यात अहिंदू मुलांनी प्रवेश केल्यावरून मोठा गोंधळ उडाला. विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाने आक्षेप घेऊन हा गरबा थांबवला. यावेळी या ठिकाणी मोठा गोंधळ उडाला. याची माहिती मिळताचं पोलीस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी हस्तक्षेप करून कोणतीही अनुचित घटना होणार नाही याची दक्षता घेतली. या गरब्याचं आयोजन गांधीनगर परिसरातील ऑॅक्सफर्ड महाविद्यालयात तिथल्या संचालकाने केलं होतं. हिंदुत्ववादी संघटनेने संचालकावर लव्ह जिहादला प्रोत्साहन दिल्याचा आरोप करत कारवाईची करण्याची मागणी केली आहे. तर पोलिसांनी आयोजकासह पाच तरुणांना अटक केली आहे. त्यांच्यावर कलम 188 अंतर्गत कारवाई करण्यात आली.
ऑॅक्सफर्ड कॉलेजचे संचालक अक्षांशु तिवारी यांनी प्रशासनाला या गरब्याच्या आयोजनाबाबत अंधारात ठेवल्याचा आरोप विहिंप आणि बजरंग दलाचे कार्यकर्ते तनू शर्मा आणि तरुण देवरा यांनी केला आहे. गरब्यासाठी 800 लोकांना परवानगी होती. तसंच तिकीट दर 150 रुपये निश्चित केला होता. मात्र, एक तिकिट 600 रुपयांना विकून हजारोंचा जमाव गोळा केला गेला. गरब्यामध्ये विशिष्ट वर्गातील तरुणांनाही प्रवेश देण्यात आला त्यामुळे लव्ह जिहादला प्रोत्साहन मिळत असल्याचा आरोपही विहिंप आणि बजरंग दलाने केला.
लव्ह जिहादला प्रोत्साहन देणं आणि धर्मविरोधी कारवाया केल्यामुळे अक्षांशु तिवारीवर कारवाई करण्याची मागणी हिंदुत्ववादी संघटनेच्या कार्यकर्त्यांनी केली आहे. पोलिसांनी कलितू तिवारी आणि पाच तरुणांवर कलम 188 अंतर्गत कारवाई केली आहे. भारतीय दंड संहितेच्या कलम 188 नुसार सरकारी अधिकार्यांनी जारी केलेल्या आदेशाचे जे पालन करत नाहीत त्यांच्याविरुद्ध शिक्षेची तरतूद करण्यात आली आहे. यानुसार जो कोणी सरकारी आदेशाचं जाणूनबुजून उल्लंघन करेल त्याला तुरूंगवास किंवा दंड किंवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात.
गरब्याच्या ठिकाणी मोठ्या संख्येने हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते पोचल्याची खबर मिळाल्यानंतर एएसपी प्रशांत चौबे, सीएसपी नंदिनी शर्मा आणि टीआय संतोष यादव यांनी इतर पोलीस ठाण्यांमधील राखीव फौज घेऊन घटनास्थळी धाव घेतली. त्यांनी हिंदुत्ववादी संघटनेच्या पदाधिकार्यांशी चर्चा करून कार्यक्रम थांबवणार असल्याचं सांगितलं. हिंदुत्ववादी संघटनेचे कार्यकर्ते रात्री उशिरापर्यंत पोलीस ठाण्यात कारवाईबाबत ठाम होते. तर पोलिसांचा फौजफाटाही रात्री उशिरापर्यंत येथे तैनात होता.