गोळेगणीतील तरुणाने केला बहुपिक पध्दतीचा यशस्वी प्रयोग….नवरात्रौत्सवामध्ये पिवळा झेंडू बहरला

पोलादपूर,

तालुक्यातील गोळेगणी गावातील एका तरूणाने आपल्या कुटूंबाच्या मदतीने बहुपिक पध्दतीचा यशस्वी प्रयोग करून आदर्श निर्माण केला आहे. या तरूणाच्या शेतामध्ये ऐन नवरात्रौत्सव काळामध्ये या शेतामध्ये पिवळा झेंडू बहरला आहे.

सद्यस्थितीमध्ये शेतीकडे व्यवसाय म्हणून पाहण्याचा दृष्टीकोन आर्थिक नियोजन आणि नफा-तोट्याचा विचार करून शेती ठेवण्याची आवश्यकता आहे. त्यासाठी गोळेगणीतील तरुण ज्ञानेश्वर मोरे यांने तालुका कृषी कार्यालयाच्या मार्गदर्शनाखाली शास्त्रीय पद्धतीने बहुमिश्र पीक पद्धतीचा यशस्वी अवलंब केला आहे. कोकणातील भात ही एकपिक पद्धती असल्याने दरवर्षी अतिवृष्टी, पाण्याचा खंड कारणामुळे पिकावर रोगराई येऊन उत्पादनावर परिणाम होतो. दरवर्षी शेती अनिश्चित असल्याने कोकणातील तरूण शहरात कामधंद्यासाठी स्थलांतरीत होत आहेत. मात्र, शहरात कामधंद्याचा पर्याय न स्विकारता गोळेगणीतील तरूण शेतकरी ज्ञानेश्वर मोरे यांनी आपल्या शेतात सर्व कोकणातील तरुणांना नवा आदर्श निर्माण होईल अशी पीकं घेण्याचा निश्चय केला. मिश्र म्हणजेच बहुपिक पद्धतीचा ज्ञानेश्वर मोरे यांनी अवलंब केला आहे.

ज्ञानेश्वर मोरे यांच्याकडे वीस गुंठे वडिलोपार्जित शेतात 40 कलमी आंब्याची लागवड आहे. त्यामध्ये आंतरपिकामध्ये 800 मिरची रोपे, 200 टॉमेटो, 300 वांगी रोपे लावून भुईमूगाचेही आंतरपीक घेतले आहे. ज्ञानेश्वर मोरे यांना यामुळे शेतीची आवड निर्माण होऊन शेजारी असणार्‍या विमल बाबाराम मोरे यांची 60 गुंठे जमीन भाडेपट्टीवर घेऊन त्या जमिनीमध्ये दीड हजार स्वीटकॉर्न मका रोपे, 70 किलो हळद, 40 किलो अद्रक, दीड हजार भेंडा रोपांसमवेत तूर आणि भूईमूग आदींचीही लागवड केली. यासोबतच अडीच हजार झेंडूच्या रोपांची लागवड करून नवरात्रौत्सव सणामध्ये शंभर रूपये किलो दराने पिवळ्या झेंडू फुलांची विक्री करत आहेत. दररोज मिळणार्‍या भेंडी, मिरची, वांगी आदी भाज्यांचीही विक्री ज्ञानेश्वर मोरे यांनी सुरू केली आहे. ज्ञानेश्वर मोरे हे स्वत: बांधकाम व्यावसायिक आहेत. पण त्यांना शेतीची ओढ असल्याने ते त्यांची पत्नी जान्हवी मोरे, मुलगा श्रेयस व मुलगी प्राची यांच्या मदतीने रोज शेतामध्ये मेहनत घेऊन पिकाची निगा घेत असून उत्पादन खुडून बाजारात विक्रीसाठी आणण्याचे काम करीत आहेत.

मिश्र पीक पद्धती प्रयोग यशस्वी करण्यासाठी पोलादपूर तालुका कृषी अधिकारी कार्यालयामधील कृषी सहाय्यक मनोज जाधव, कृषी पर्यवेक्षक श्रीरंग मोरे, मंडळ कृषी अधिकारी सुरज पाटील यांचे वेळोवेळी मार्गदर्शन लाभत असते.

बातमी शेअर करा :
error: Content is protected !!