शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे भाजपमध्ये; सरकार लवकरच कोसळेल – चंद्रकांत पाटील
देगलूर (नांदेड),
’बिलोली विधानसभा पोटनिवडणुकीत तुम्ही भाजपाचे उमेदवार सुभाष साबणे यांना विजयी करा. सध्या आघाडीचे असलेले हे घोटाळेबाज सरकार लवकरच कोसळेल. महाराष्ट्र राज्याच्या सत्तेत कालचक्राप्रमाणे तुम्हाला बदल झाल्याचे दिसून येईल. हे तिघाडीचे सरकार जनतेने दिलेले सरकार नसून धोक्याने आलेले सरकार आहे. हे तिघाडी सरकार आणखीन कुणालाही सोबत घेऊन लढले तरी विजय हा आमचाच निश्चित आहे’, असा ठाम विश्वास भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी देगलूर येथे मेळाव्यात व्यक्त केला. शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी समर्थकांसह भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत भाजपात जाहीर प्रवेश केला. यावेळी भाजपच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित केला होता. मेळावा संपल्यानंतर चंद्रकांत पाटलांनी पत्रकारांशी संवाद साधला.
अशोक चव्हाणांवर निशाणा
’अशोक चव्हाण यांनी भाजपकडे उमेदवार नसल्याने शिवसेनेच्या व्यक्तीला तिकीट दिल्याची टीका केली. चव्हाण यांनी आम्हाला शिकवू नये. शिवसेनेचा एवढाच पुळका असेल तर चव्हाणांनी देगलूरला काँग-ेसऐवजी शिवसेनेला ही जागा सोडली असती. राज्यातील रस्त्यांची भयानक दुरावस्था झाली आहे. अशी अवस्था कधीही झाली नव्हती. चव्हाण यांनी स्वत:चं खातं व्यवस्थित चालवावं’, अशी टीका चंद्रकात पाटील यांनी केली. ’अतिवृष्टीने नुकसान झालेल्या शेतकर्यांना मदत तर लांब मात्र उध्दव ठाकरे यांनी शेतकर्यांची साधी विचारपूस देखील केली नाही. पंचनामे करायला शेतात उरलंय तरी काय? माती सुध्दा वाहून गेली आहे. 2019 च्या जीआर प्रमाणे शेतकर्यांना मदत करावी’, अशी मागणी चंद्रकात पाटील यांनी केली.
भाजपमध्ये येणार्यांचा योग्य सन्मान राखू – चिखलीकर
’जिल्ह्यात यापूर्वी मोठ्या प्रमाणात सरंजामशाही होती. मात्र आता हळूहळू अनेकांना त्यांचे सर्व कारणामे कळत असल्याने अनेकजण भाजपात प्रवेश करीत आहेत. यापुढे भाजपाच्या कार्यकर्त्याकडे बोट दाखवण्याची हिंमत सताधार्यांना होणार नाही. भाजपात येणार्यांचा योग्य तो सन्मान राखला जाईल’, अशी ग्वाही खासदार प्रताप पाटील चिखलीकर यांनी यावेळी दिली.
मतदार मला सेवेची संधी देतील – सुभाष साबणे
पक्ष प्रवेशानंतर माजी आमदार सुभाष साबणे यांनी पक्ष सोडताना अतिशय दु:ख होत असल्याचे सांगितले. यावेळी त्यांना गहिवरुन आले. मात्र कार्यकर्त्यांवर होणारा अन्याय, मुस्कटदाबीमुळे मला हा निर्णय घेऊन पोट निवडणुकीला सामोरे जावे लागत आहे. मतदार मला पुन्हा सेवेची संधी देतील असा मला विश्वास आहे’, अशी अपेक्षा साबणेंनी व्यक्त केली.